*पंढरपूर सिंहगड महाविद्यालयामध्ये शिवजंयती मोठया उत्साहात साजरी*
19 फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण भारतात आणि विशेषत: महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा जन्मदिवस (शिवजंयती) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे इतिहासाच्या गौरवशाली क्षणांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. शिवाजी महाराजांनी केवळ एक साम्राज्य स्थापन केले नाही तर एक संस्कृती, एक स्वाभीमानी विचारधारा निर्माण केली. त्यांच्या स्वराज्य स्थापनेमागील ध्येय, त्याग आणि कष्ट आपण समजून घेतले पाहीजे. शिवरायांच्या विचाराप्रमाणे आपण एकजूट होऊन, स्वाभीमानाने आणि नितीमत्तेने जीवन जगण्याचा संकल्प करुया.
राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी, पंढरपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती अगदी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवाजी महाराज जंयतीच्या उदघाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.चंद्रकांत देशमुख, समन्वयक प्रा.सुमित इंगाले, प्रा. शिवाजी पवार, डॉ. नामदेव सावंत, प्रा. समाधान माळी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजाच्या प्रतिमेला हार घालून दिपप्रज्वलन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज जंयतीचे औचित्य साधून महाविद्यालयामार्फत पालवी प्रकल्प येथे जाऊन सर्व राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थीवर्गाने शिवजयंती साजरी करुन तेथील अनाथ मुलांना भेट देऊन त्यांना खाऊ वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. महाविद्यालयातील विद्यार्थी ओम पवार व सानीया मुल्ला या विद्यार्थ्यांनी पालवी येथे झालेल्या शिवजयंती उत्सवात शिवरायावर भाष्य केले. त्यांनी आपल्या भाषणात वक्तव्य केले की, “नमस्कार मावळ्यांनो, शिवभक्तांनो आणि स्वराज्याच्या अभिमानी संततीनो!”
आजचा दिवस केवळ एक तारीख नसून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माचा अभिमानाचा दिवस आहे. शिवरायांचा जन्म हा अन्यायाविरुद्ध उभे राहणाऱ्या स्वाभिमानी युगाचा प्रारंभ होता. राजमाता जिजाऊंच्या संस्कारातून घडलेले शिवराय शौर्य, न्याय आणि जनकल्याण यांचे प्रतीक होते. रायगड किल्यावरील राज्याभिषेकाने स्वराज्याचा सूर्य तेजाने उगवला. आज त्यांच्या स्मृतीपुढे नतमस्तक होत आपण स्वराज्याच्या मूल्यांचे जतन करण्याची आणि अन्यायासमोर न झुकण्याची प्रतिज्ञा करूया. जय भवानी ! जय शिवाजी !
तसेच शिवजंयतीचे औचित्य साधून महाविद्यालयातील संकेत घुटूकडे यांनी शिवाजी महाराजांची वेशभूषा व सृष्टी जगदाळे हिने राजमाता जीजाऊची वेशभूषा केली. तसेच पालवीच्या संस्थापिका मंगलताई शहा यांनी देखील आपल्या भाषणात विद्यार्थ्यांसाठी संदेश दिला की, मुलांनी आपले चरित्र हे छत्रपती शिवाजी महाराजाप्रमाणे घडवावे, ज्यामुळे आपली संस्कृती जपली जाईल. स्त्रिया आणि मुलींविषयी आपले विचार नेहमी शुद्ध आणि आदरयुक्त असावेत. महाराजांचे विचार आत्मसात करून त्याप्रमाणे वागा आणि आयुष्यात काहीतरी असे साधा जे गौरवाने स्मरलं जाईल.
कार्यक्रम यशस्वी करणेसाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी अविराज साळुंखे, गणेश पवार, आकाश पवार, संकेत खडतरे, हर्षद शिंदे, हषवर्धन गायकवाड, प्रणव शिवारकर, संकेत घुटकूडे, सानीया मुल्ला, सृष्टी जगदाळे, स्नेहा कदम, वैष्णवी देवकर, रेष्मा पठाण, पुर्वा वाखारकर, मयुरी झुरे, राधिका निकम व श्रावणी पवार तसेच महाविद्यालयातील कर्मचारी प्रभाकर शिंदे तसेच सिक्युरिटी विभाग यांनी परिश्रम घेतले.

