एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात "आयडियाथॉन 2025" - नवोन्मेष आणि नवकल्पनांच्या झळकत्या कल्पनांचा संगम*

 *एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात "आयडियाथॉन 2025" - नवोन्मेष आणि नवकल्पनांच्या झळकत्या कल्पनांचा संगम*



पंढरपूर | १६ ऑक्टोबर २०२५

कोर्टी, पंढरपूर येथील एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये "आयडियाथॉन 2025" हा विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना चालना देणारा उपक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात तृतीय वर्षाच्या सुमारे ३९० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत तांत्रिक, सामाजिक व औद्योगिक समस्यांवरील सृजनशील उपाय योजना सादर केल्या.

कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी सौ. विभावरी पाटील यांनी विद्यार्थ्यांना केवळ तांत्रिक ज्ञान पुरेसे नसून संवाद कौशल्य, टीमवर्क आणि सॉफ्ट स्किल्स यांचे महत्त्व पटवून दिले. नवोन्मेष हे केवळ कल्पनांपुरते मर्यादित न राहता, प्रभावी सादरीकरण व अंमलबजावणी यातूनच त्याचे खरे मूल्य ठरते, असे त्यांनी स्पष्ट केले.

विशेष अतिथी श्री. नरहरी वाघ यांनी ऑटोमोटिव्ह उद्योगातील नवोन्मेषाचे वास्तव आणि गरज विशद केली. “आजच्या युगात स्थिर राहणे म्हणजे मागे पडणे. सातत्याने नवे विचार आणि कल्पना प्रत्यक्षात उतरविणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे,” असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्मार्ट टेक्नॉलॉजी, पर्यावरण पूरक उपाय, आरोग्य सेवा सुधारणा, शिक्षण सुलभीकरण यांसारख्या विविध क्षेत्रांतील समस्यांवर नावीन्यपूर्ण उपाय मांडले. या प्रकल्पांतून समाजाभिमुख दृष्टिकोन आणि टेक्नॉलॉजीचा सकारात्मक वापर दिसून आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. के. जे. करांडे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना बौद्धिक संपदा हक्क (Intellectual Property Rights) यांचे महत्त्व पटवून दिले. “संशोधन किंवा नावीन्यपूर्ण कल्पना ही तुमची संपत्ती आहे. तिचे पेटंट, कॉपीराइट यांच्याद्वारे कायदेशीर संरक्षण मिळवणे अत्यावश्यक आहे,” असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या स्वागत व प्रस्तावनाने झाली. त्यांनी “आयडियाथॉन” च्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांच्या सृजनशील सहभागाचे कौतुक केले.

इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा सौ. वैशाली काशीद या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक करत "विचारांना कृतीचे रूप देणे" हेच खरे यश असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. एस. बी. बोळे यांनी आभारप्रदर्शन करत सर्व मान्यवर, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad