*सिंहगड पंढरपूरच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांची पंढरपूर पोलीस क्वार्टर्सच्या इमारतीच्या बांधकाम साईटला शैक्षणिक भेट*
बांधकाम प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक निरीक्षण
पंढरपूर (प्रतिनिधी) - एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी पंढरपूर पोलीस क्वार्टर्सच्या नव्या इमारतीच्या बांधकाम साईटला शैक्षणिक भेट दिली. या उपक्रमाची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या शैक्षणिक भेटीमधून विद्यार्थ्यांना बांधकाम प्रक्रियेतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सुरक्षा नियमांचे पालन, काँक्रीट मिक्सिंग, रिइनफोर्समेंट डिटेलिंग, गुणवत्ता नियंत्रणाच्या पद्धती यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. तसेच साईटवरील अभियंते व सुपरवायझर्स यांनी विद्यार्थ्यांना बांधकाम व्यवस्थापन, वेळ व खर्च नियंत्रण या महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन केले.
पंढरपूर येथे पोलीस क्वार्टर्सच्या इमारतीचे बांधकाम सुरू असून, त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांनी वर्गात शिकवले जाणारे सिद्धांत प्रत्यक्षात कसे लागू होतात, याचे निरीक्षण केले. या अनुभवातून विद्यार्थ्यांना बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक संधींबाबतही मौल्यवान माहिती मिळाली.
या उपक्रमाबद्दल विभागप्रमुखांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी तसेच भविष्यातील व्यावसायिक कारकिर्दीसाठी हे अनुभव उपयुक्त ठरतील, असे मार्गदर्शन केले.
ही भेट प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, व विभागप्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. यशस्वी आयोजनासाठी प्रा. गणेश लकडे, प्रा. मिलिंद तोंडसे तसेच विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

