*एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर येथे अभियंता दिन उत्साहात साजरा*
पंढरपूर (दि. १५ सप्टेंबर): भारतरत्न मोक्शगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिन दरवर्षी १५ सप्टेंबर रोजी देशभर साजरा केला जातो. या दिनानिमित्त एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर येथे या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. एस. बी. देवसारकर, टीईक्यूआयपी प्रकल्प संचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे हे उपस्थित होते. प्रमुख अतिथींचा सत्कार प्राचार्य डॉ. करांडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी केले.
आपल्या प्रेरणादायी भाषणात डॉ. देवसारकर यांनी अभियंता म्हणून विद्यार्थ्यांवर असलेल्या जबाबदाऱ्या आणि सामाजिक कर्तव्यांवर प्रकाश टाकला. तसेच, उच्च शिक्षणातील विविध संधी आणि त्याचा अभ्यास करताना घ्यावयाची दिशा याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. करांडे यांनी आंतरशाखीय प्रकल्पांचे महत्त्व अधोरेखित केले. विविध शाखांमधील समन्वय साधून नविन प्रकल्पांची अंमलबजावणी करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी महाविद्यालयामार्फत "बेस्ट ऑफ डिपार्टमेंट" पुरस्कार संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागास प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार प्रमुख पाहुणे डॉ. देवसारकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यार्थिनी वेदिका डुबल व अमीना बेद्रेकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. यशवंत पवार यांनी केले.
हा सोहळा महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच पंढरपूर परिसरातील मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला.

