स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये ‘फार्माकोव्हिजिलन्स आणि क्लिनिकल ट्रायल मधील संधी’ यावर एक दिवसीय व्याख्यान संपन्न

 

स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये ‘फार्माकोव्हिजिलन्स आणि क्लिनिकल ट्रायल मधील संधी’

यावर एक दिवसीय व्याख्यान संपन्न



पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचालित कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये बेंगलोर मधील ‘नोवोटेक क्लिनिकल रिसर्च कंपनी’चे व्यवस्थापकीय संचालक संजय काबरा यांचे एक दिवसीय ‘इंडस्ट्री एक्स्पर्ट लेक्चर’ संपन्न झाले. करिअरच्या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या ‘फार्माकोव्हिजिलन्स आणि क्लिनिकल ट्रायल यांचे महत्व आणि गरज’ या विषयावर हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. 

            स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांच्या नेतृत्वाखाली या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काबरा यांना या क्षेत्रातील जवळपास २६ वर्षांचा अनुभव असून आशिया पॅसिफिक मधील जवळपास २२ देशांमध्ये क्लिनिकल रिसर्चच्या क्षेत्रात काम करणाऱ्या तसेच ट्रेनिंग ऑफिसर म्हणून कार्यरत असणाऱ्या क्लिनिकल रिसर्च कामगारांना त्यांनी प्रशिक्षण दिले आहे. दीपप्रज्वलनानंतर डॉ. मणियार म्हणाले की, ‘फार्माकोव्हिजिलन्स हे फार्मसी क्षेत्रातले माहिती आणि तंत्रज्ञान विभागातील महत्वाचे कार्यक्षेत्र आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना आपले करिअर करण्यासाठी उत्कृष्ट संधी असतात. तसेच औषधांच्या प्रतिकूल प्रतिक्रिया (एडीआर) आणि दुष्परिणामांचे निरीक्षण करून सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करणे हे फार्माकोव्हिजिलन्सचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. ‘फार्माकोव्हिजिलन्स’ मुळे संभाव्य जोखमींचा लवकर शोध घेतल्याने आरोग्यसेवा व्यावसायिकांना प्रतिबंधात्मक कृती करण्याची परवानगी मिळते. यामध्ये डोस समायोजित करणे किंवा बाजारातून हानिकारक औषधे काढून घेणे यांचा समावेश आहे. त्यामुळे या क्षेत्रात नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी करिअरसाठी उत्तम पर्याय म्हणून या क्षेत्राकडे पाहण्यास हरकत नाही. आज धकाधकीच्या जीवनात फार्मसीचे महत्व वाढत आहे. आय. टी. इंडस्ट्रीमध्ये सध्या असणाऱ्या मागणीमुळे विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये भारत आणि भारताबाहेर ही खूप संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे या विषयाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरेल.’ फार्माकोव्हिजिलन्स सोबतच त्यांनी मेडिकल कोडींग, क्लीनिकल रिसर्च, रेगुलेटरी अफेअर्स, क्लिनिकल डेटा मॅनेजमेन्ट या विविध आय. टी. शी संबंधित असणाऱ्या कार्यक्षेत्राबद्दल माहिती सांगितली. या सर्व क्षेत्रांचा एकमेकांशी कसा संबंध आहे ? हे देखील त्यांनी सविस्तर सांगितले. आय. टी. कंपनीमध्ये कशा पद्धतीचे कामकाज चालते, यासाठी कोणती साधने, कोणते सॉफ्टवेअर वापरले जातात, कंपनीमध्ये काम करताना कार्यप्रणाली कशा पद्धतीने असते, सध्या फार्मा आय. टी. इंडस्ट्री कंपन्यांची गरज आणि अभ्यासक्रमामध्ये आवश्यक गोष्टी यांबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. दुपारच्या सत्रामध्ये कंपन्यांमध्ये ‘इंटरव्हिव्ह’ कशा पद्धतीने असतात ह्यासाठी प्रत्यक्षरित्या मॉक इंटरव्यूव्ह घेतले. विद्यार्थ्यांकडून इंटरव्यूव्हमध्ये होत असणाऱ्या सामान्य चुका, त्या कशा टाळायच्या आणि कशा पद्धतीने उत्तम सादरीकरण होईल याकडे कसे लक्ष द्यायचे याबाबत छायाचित्रे व व्हिडिओ यांच्या माध्यमातून त्यांनी मार्गदर्शन केले. इंटरव्यूव्ह मध्ये काय केले पाहिजे आणि काय टाळले पाहिजे याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. फ्रेशर विद्यार्थ्यांना विचारले जाणारे संभाव्य प्रश्न कोणते असतील तसेच त्यांची उत्तरे कशी द्यावीत, इंटव्युव्ह साठी जाताना पूर्व तयारी कशी करावी, अभ्यास कसा करावा याबद्दलची सखोल माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘मुलाखतींमध्ये आत्मविश्वास महत्त्वाची भूमिका बजावतो, मुलाखतकाराची उमेदवाराबद्दलची धारणा आणि उमेदवाराची एकूण कामगिरी या दोन्हींवर याचा परिणाम होतो. आत्मविश्वास मुलाखतीवर परिणाम करू शकतो. अशा काही प्रमुख गोष्टींमध्ये देहबोली, आवाज या महत्वाच्या बाबींवर विशेष लक्ष दिले पाहिजे’ असे सांगून विविध क्षेत्रातील मुलाखतींवर काबरा यांनी प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी सुद्धा विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देत आपला सक्रिय सहभाग नोंदवला. यावेळी विद्यार्थ्यांच्या करिअर विषयी असणाऱ्या प्रश्नांनाही मान्यवरांनी समाधानकारक उत्तरे दिली. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. प्रदीप जाधव यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad