स्वेरीचा स्तुत्य उपक्रम वारकऱ्यांसाठी आनंददायी व हिताचा -माजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे स्वेरीच्या संशोधन विभागाच्या प्रदर्शनाचे आषाढी वारीत उदघाटन


स्वेरीचा स्तुत्य उपक्रम वारकऱ्यांसाठी आनंददायी व हिताचा                                                                                    

                                                                               -माजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे

स्वेरीच्या संशोधन विभागाच्या प्रदर्शनाचे आषाढी वारीत उदघाटन



पंढरपूर- ‘महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांसह इतर अनेक राज्यातील लाखो भाविक व वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने श्री. विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरीत येत असतात. त्यांना श्री. विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन झाल्याचे समाधान तर मिळतेच पण त्याचबरोबर जाता जाता स्वेरीच्या ग्रामीण व कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतीविषयक मौलिक माहिती मिळते ही देखील अधिक समाधानाची बाब आहे. शेतकरी-वारकऱ्यांच्या मध्ये नवीन तंत्रज्ञान, विज्ञान आणि संशोधन रुजवण्याचे कार्य या प्रदर्शनाच्या माध्यमातून स्वेरी तथा डॉ.बी. पी. रोंगे सर आणि त्यांचे सहकारी सातत्याने करत आहेत हे खूप महत्त्वाचे आहे. हा त्यांचा स्तुत्य उपक्रम शेतकऱ्यांसाठी आनंददायी आणि हिताचा आहे.’ असे प्रतिपादन राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.



        भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई आणि स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर (ऑटोनॉमस) यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण मानव आणि संसाधन विकास सुविधा केंद्र (आर.एच.आर. डी. एफ.) आयोजित ‘ग्रामीण व कृषी तंत्रज्ञान प्रदर्शना’चे आज माजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते उदघाटन झाले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक-सचिव व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे हे होते. ग्रामीण भागामध्ये तंत्रज्ञान आधारित विकास गंगा पोहचावी आणि ग्रामीण भागातील नागरिक व शेतकऱ्यांचा आर्थिक व सामाजिक विकास व्हावा हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. गाव आणि शहर यामध्ये पडत असलेली दरी कमी व्हावी या हेतूने हा उपक्रम गेल्या दहा वर्षापूर्वीपासून भारताचे जेष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या संकल्पनेतून राबविला जात आहे. या प्रदर्शनामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाद्वारे विकसित बियाणे, कृषी संबंधित विविध कार्यासाठी आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर, विविध कृषी साहित्य व कृषी अवजारे हे पाहण्यासाठी वारकरी, शेतकरी व ग्रामस्थ गर्दी करत असतात. शेतकऱ्यांसाठी असलेल्या सुविधा, बियाणे, औजारे, माती परीक्षण संच, पाणी परीक्षण, अनार दाणा, चिक्कु पावडर, विविध प्रकारचे पापड, शेंगदाणे बियाणे, कडधान्ये, ड्रोन तंत्रज्ञानाचा शेतीसाठी वापर यासंबंधी माहिती यातून मिळत आहे. तसेच माती परीक्षण किट, सोलार ड्रायर, तुळशी चहा, रोपे पेरणी यंत्र, जल शुद्धीकरण संयंत्र, यांत्रिक शेती, विज्ञान, माती परीक्षण, सोलर ड्रायरच्या माध्यमातून तयार केलेली उत्पादने, विविध प्रकारचे तंत्रज्ञान या प्रदर्शनात मांडलेले आहेत. सोबतच पशुधन विकास, फळभाजी संवर्धन, पाणी संवर्धन, जलशुद्धीकरण यंत्र, शेती, विज्ञान व तंत्रज्ञान या विषयी माहिती एलसीडी प्रोजेक्टरच्या माध्यमातून या प्रदर्शनात दिली जात आहे. या प्रदर्शनाला वारकरी, शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी विजापूर, गुलबर्गा, बागलकोट, यवतमाळ, नांदेड, परभणी, सांगली, सातारा, परभणी, यवतमाळ, सोलापूर अशा विविध जिल्ह्यातील वारकरी व शेतकऱ्यांनी भेटी देवून माहिती जाणून घेतली. यावेळी पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य राजेश पांडे, मोहन डांगरे, गोपाळपूरचे सरपंच अरुण बनसोडे, उपसरपंच बाळासाहेब आसबे, तारापूर परमाणु विद्युत केंद्र सामाजिक जबाबदारी (सीआरएस) अंतर्गत सुरु असलेल्या आकृती विभागाचे प्रमुख डॉ.आर.एस. पवार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.पी.एम.पवार, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार, संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. ए.पी.केने, समन्वयक डॉ. एम.एम.अवताडे, प्रा. अंतोष द्याडे, बालाजी सुरवसे यांच्यासह इतर प्राध्यापक व कर्मचारी, स्वेरीचे प्राध्यापक वर्ग यांच्यासह ग्रामस्थ व वारकरी उपस्थित होते. प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.


मी मागील १५ वर्षापासून श्री विठ्ठलाच्या दर्शनाला येतो. स्वेरीच्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्हा शेतकऱ्यांना नवनवीन तंत्राची, पिके जोमाने येण्यासाठी बियाणे, पाणी, माती परीक्षण आदी शेती विषयक माहिती मिळाली. आता भविष्यात आम्ही आमच्या शेतीचा विकास करण्यासाठी या विज्ञान तंत्राचा वापर करून अधिक प्रगती करू शकतो. 

                                                                            -वारकरी आत्माराम काकडे, बाबापूर (ता.वणी, जि.यवतमाळ)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad