कठीण परिश्रम हीच यशाची गुरुकिल्ली
- डॉ.शुभमकुमार, परीवेक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक (आयपीएस)
स्वेरीत राष्ट्रीय स्तरावरील ‘स्पिरीट २ के २४’ या उपक्रमाचे उदघाटन
पंढरपूरः ‘युपीएससी सारख्या उच्च दर्जाच्या स्पर्धा परीक्षा देताना आपण अभ्यासाचे योग्य वेळापत्रक बनवा, एकाग्रता ठेवा, यासाठी स्वतःला काही नियम बांधून घ्या म्हणजे तुम्ही पाहिलेल्या स्वप्नाकडे यशस्वीपणे झेप घेता येईल. यासाठी मात्र कठीण परिश्रम घ्यावे लागतात कारण कठीण परिश्रम हीच यशाची गुरुकिल्ली होय.’ असे प्रतिपादन डॉ.शुभमकुमार, परीवेक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक (आयपीएस) यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विभागामध्ये आयोजिलेल्या राष्ट्रीय स्तरावरील ‘स्पिरीट २ के २४’ या एकदिवशीय तांत्रिक संशोधनपर कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शुभमकुमार, परीवेक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक (आयपीएस) हे मार्गदर्शन करत होते. प्रास्तविकात आयकॉनचे विद्यार्थी अध्यक्ष संकेत कोळी यांनी ‘स्पिरीट २ के २४’ या स्पर्धेचे स्वरूप, नियमावली तसेच सहभागी विद्यार्थ्यांना व विजेत्यांना दिल्या जाणाऱ्या बक्षिसांचे स्वरूप, स्पर्धेचे नियम व संबंधित बाबी स्पष्ट केल्या. विभागप्रमुख डॉ. एस.पी.पवार यांनी विभागात नियमित चालणारे उपक्रम सांगून तंत्रशिक्षणामध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील 'गेट' (ग्रॅज्युएट एप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग) या परीक्षेमध्ये देशातून ३९ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले व तृतीय वर्षात शिक्षण घेणारे गणेश कचरे यांच्यासह यशस्वी झालेल्या १० विद्यार्थ्यांच्या यशाकडे लक्ष वेधले. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे म्हणाले की, ‘करिअर मध्ये यशस्वी होण्यासाठी योग्य मार्गाने परिश्रम करणे गरजेचे आहे. स्पर्धेत सहभाग घेतल्यावर आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होईल.’असे सांगून त्यांनी स्वेरीची वाटचाल, त्यातील महत्वाचे टप्पे व मिळालेले घवघवीत यश सांगून ‘स्वेरी’ ब्रँड कसा बनला’ याचा लेखा-जोखा सांगितला. पुढे बोलताना प्रमुख पाहुणे डॉ.शुभमकुमार, परीवेक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक (आयपीएस) म्हणाले की, ‘मी ही पंजाब मधील एका खेडेगावातून आलेलो आहे आणि माझे सुरुवातीचे शिक्षण खेडेगावातच झाले. आपण आपले ध्येय अगोदरच निश्चित करून त्यानुसार वाटचाल केली पाहिजे. स्वेरी हे एक शिस्तीचे महाविद्यालय असून याचा फायदा आपल्याला भविष्यात होईल. आपल्याला मित्र निवडक असावे पण ते उपयोगी पडले पाहिजेत. प्रत्येक स्पर्धेत आपण सहभागी व्हायला हवे कारण स्पर्धेत विजय महत्वाचा नसतो तर आपण त्या स्पर्धेत किती सहभागी होतो हे खूप महत्त्वाचे असते. अशा स्पर्धेतून आत्मविश्वास वाढतो. नवनवीन संकल्पना निर्माण होतात. स्पर्धेच्या माध्यमातून अनुभव घेणे महत्वाचे असते. तो अनुभव आपल्याला पुढील आयुष्यात करिअरच्या दृष्टीने खूप काही शिकवत असतो.’ असे सांगून विद्यार्थ्यांना युपीएससी व इतर स्पर्धा परीक्षा देण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी पात्रता, अभ्यासक्रम आदी संबंधित शंका विचारल्या असता डॉ. शुभमकुमार, परीवेक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक (आयपीएस) यांनी त्यांची समर्पक उत्तरे दिली. यामध्ये ‘स्पिरीट २ के २४’ या राज्यस्तरीय स्पर्धेत पोस्टर प्रेझेन्टेशन, विन टू बझ, मिरर कोड, लोगो डीझाईन, स्टार्टप आयडीया, तंबोला, बीजीएमआय व एनएफएस या इव्हेंट्स मध्ये इतर कॉलेजचे विद्यार्थी- स्पर्धक देखील सहभागी झाले आहेत. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आयकॉन समन्वयक प्रा.पी.डी. माने, स्पिरीट समन्वयक प्रा.के.आय.चौहान यांच्यासह स्पिरीट उपक्रमातील पदाधिकारी, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी परिश्रम घेत आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातून व विद्यार्थी स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. उदघाटन प्रसंगी पोलीस नाईक गजानन माळी, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता प्रा. के.बी.पाटील, प्रा. एस.एम. शिंदे व इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन साक्षी शिंदे व सोनाली करवीर यांनी केले तर एमसीए विभागाचे प्रमुख प्रा. एम.वाय. शेख यांनी आभार मानले.
चौकट-
विद्यार्थ्यांना यशाबाबत महत्वाचा संदेश देताना ते म्हणाले की ‘आपले लक्ष ध्येयावरून विचलित होऊ देऊ नका आणि यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमाला कोणताही पर्याय नसतो. आपले ध्येय उच्च ठेवा, त्यासाठी कठोर परिश्रम करा आणि नेहमी आत्मविश्वास बाळगा, यश नक्कीच मिळेल.’