राष्ट्रीय सेवा योजनेच्या उपक्रमांतून आत्मविश्वास वाढतो
-रासेयोचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे
स्वेरीत ‘आपत्ती व्यवस्थापन व नेतृत्व विकास’ या कार्यशाळेचा समारोप
पंढरपूर –‘आपत्तीत बळी पडलेल्या माणसाला सर्व प्रथम धीर देवून त्याची मानसिकता सांभाळण्याची गरज असते यासाठी अत्यंत सकारात्मकतेची भाषा वापरावी लागते. या अशा कार्यशाळेमधूनच भविष्यात भक्कम नेतृत्व तयार होत असते. म्हणून राष्ट्रनिर्मितीसाठी ‘राष्ट्रीय सेवा योजना’ ही अतिशय महत्वाची भूमिका बजावते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या वागणुकीत धाडसीपणा येतो.’ असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व रासेयो विभाग, स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ‘आपत्ती व्यवस्थापन व नेतृत्व विकास’ या विषयावर दि.२१ मार्च ते दि. २३ मार्च २०२४ या दरम्यान कार्यशाळेचे आयोजन केले होते. याच्या समारोप प्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे हे मार्गदर्शन करत होते. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी. पी. रोंगे यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली स्वेरीच्या कॅम्पसमध्ये तीन दिवस ही ‘आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा’ पार पडली. या तीन दिवसात विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत महत्वपूर्ण माहिती मिळाली. यामध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिसागर ढोले यांनी आपत्ती व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन सहाय्यक अधिकारी अर्चना बिसोई यांनी नैसर्गिक व मानव निर्मित आपत्तीचे विविध प्रकार, पंढरपूर नगर परिषदेच्या अग्निशामक दलाचे अधिकारी संभाजी कार्ले यांनी आगीचे प्रकार, आग कशी विझवावी, आग आटोक्यात आणण्यासाठी नेमके काय करावे व आगीपासून संरक्षण कसे करायचे यावर महत्वाची माहिती दिली. परशुराम कोरे यांनी आपत्तीमध्ये जखमी माणसाला तात्काळ दवाखान्यात कसे पोचवायचे, यासाठी संबंधितांना कसा संपर्क साधायचा, यावेळी ‘प्रथमोपचार कसे करावे’ याचे प्रात्यक्षिक करून सविस्तर माहिती दिली. राष्ट्रीय सेवा योजनाचे पंढरपूर विभागीय समन्वयक डॉ.संजय मुजमुले यांनी ‘व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर तर स्वेरीच्या रासेयोचे सल्लागार डॉ.आर.एन.हरिदास यांनी ‘नेतृत्व व विकास’ या विषयावर बहुमोल मार्गदर्शन केले. पुढे बोलताना संचालक डॉ. वडजे म्हणाले की, ‘शैक्षणिक उपक्रम असो अथवा कोणताही सामाजिक कार्यक्रम असो स्वेरीमध्ये डॉ. रोंगे सरांच्या नेतृत्वाखाली अत्यंत नियोजनपूर्ण, शिस्तबद्ध आणि बहारदार होत असताना कुठेही उणीव भासत नाही हे आता सर्वश्रुत आहे. उत्तम नियोजन असल्यामुळे ‘आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा’ स्वेरीमध्ये घेण्याचे ठरवले. स्वेरीने यासाठी त्वरित हिरवा कंदील दाखवला. या कार्यशाळेत मागील तीन दिवसांमध्ये स्वेरीने अपेक्षेप्रमाणे उत्तम नियोजन तर केलेच पण कार्यक्रम कसे आयोजित केले पाहिजेत याचा आदर्श घालून दिला. या अशा उत्तम नियोजनामुळे स्वेरीमध्ये प्रत्येक उपक्रमांना यश मिळते.’ असे सांगून स्वेरीच्या रासेयोतील अधिकारी, पदाधिकारी व विद्यार्थ्यांची पाठ थोपटली. या कार्यशाळेत उमा महाविद्यालय पंढरपूर, यशवंतभाऊ पाटील महाविद्यालय भोसे, दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय मंगळवेढा, स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी पंढरपूर व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर या महाविद्यालयातील रासेयोचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी प्रीती लोंढे, श्वेता माळी, उमेश मेटकरी, प्रा. दत्तात्रय माळी यांनी ‘आपत्ती व्यवस्थापन’ कार्यशाळेत आलेला अनुभव सांगितला. प्रवेश प्रक्रिया विभागाचे अधिष्ठाता प्रा.के.बी. पाटील म्हणाले की, ‘धकाधकीच्या जीवनात रासेयोच्या अशा कार्यशाळेमुळे आपत्तीजनक परिस्थिती असताना संकटात देखील धीरोदात्तपणे उभे राहून संकटावर मात करता येते याचे शिक्षण मिळाले. यामुळे विद्यार्थ्यामधील आत्मविश्वास वाढला तसेच राष्ट्रनिर्मितीसाठी अशा उपक्रमाची गरज आहे.’ असे सांगितले. ही कार्यशाळा यशस्वीपणे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आले. याप्रसंगी स्वेरीचे विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.एम.एस. मठपती, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. रविकांत साठे, डॉ. धनंजय चौधरी, डॉ. एम. एम. आवताडे, प्रा. एस.बी. खडके, प्रा. बी.टी. गडदे, प्रा.जी.जी. फलमारी, प्रा.सौ. पी. व्ही. पडवळे, प्रा.मेघा सोनटक्के, प्रा. एस. डी. माळी, फार्मसीचे प्रा. एच.बी.बनसोडे, इतर प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. के.एस.पुकाळे यांनी सूत्रसंचालन केले तर कार्यक्रम अधिकारी डॉ. धनंजय चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.