शिस्त व संस्कार यामुळे चांगला माणूस घडतो -पालक प्रतिनिधी दिलीप ढाकणे-पाटील

                                        

शिस्त व संस्कार यामुळे चांगला माणूस घडतो

                                            -पालक प्रतिनिधी दिलीप ढाकणे-पाटील

स्वेरीत ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग’ विभागाचा पालक मेळावा संपन्न




पंढरपूर- ‘मी अनेक महाविद्यालये पाहून, सर्व बाबी तपासून अखेर माझ्या कन्येला स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश मिळविला. स्वेरीने देखील आम्ही टाकलेला विश्वास सार्थ ठरविला. आमच्या पाल्यांमध्ये शिक्षण, शिस्त, आत्मविश्वास आणि संस्कार यामध्ये कमालीची प्रगती दिसून येत आहे. एकूणच पाल्यांच्या प्रगतीमध्ये स्वेरीचा सिंहाचा वाटा आहे हे मात्र निश्चित! स्वेरीतील शिस्त व संस्कार या गुणामुळे आमचा पाल्य अभियंता घडण्याबरोबरच एक चांगला माणूस म्हणून समाजात नावारूपास येत आहे.’ असे प्रतिपादन पालक प्रतिनिधी दिलीप ढाकणे-पाटील यांनी केले.

      गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग’ या विभागातर्फे ‘पालक मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी पालक प्रतिनिधी म्हणून दिलीप ढाकणे-पाटील, सचिन बारटक्के व महिला पालक प्रतिनिधी म्हणून सौ. योगेश्वरी जोशी ह्या उपस्थित होत्या. दीपप्रज्वलनानंतर विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार या पालकांशी संवाद साधताना म्हणाल्या की, ‘पाल्यांच्या जडणघडणीमध्ये पालकांचा देखील महत्वाचा वाटा आहे. म्हणून पाल्यांच्या प्रगतीसाठी पालकांसमवेत सुसंवाद व्हावा या हेतूने ‘पालक मेळाव्या’चे आयोजन केले आहे.’ असे सांगून डॉ. पवार यांनी विभागामध्ये घेतले जाणारे विविध शैक्षणिक उपक्रम, ट्रिपल पीई, इफेक्टिव्ह टीचिंग-लर्निंग स्कीम, नाईट स्टडी, महाविद्यालयाला मिळालेली विविध मानांकने, स्पर्धा परीक्षेची तयारी, प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी घेतलेली गरुड झेप, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्राणायम, आर्ट ऑफ लिव्हिंग सारखे प्रशिक्षण आदी बाबत सविस्तर माहिती दिली. प्लेसमेंट विभागाचे प्रा.अविनाश मोटे हे मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या ‘गेट परीक्षा, स्वेरी कॉलेजमध्ये येणाऱ्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांबद्दल, प्लेसमेंट विभागामार्फत चालणारे कार्य, विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास वाढीसाठी व करिअर करण्यासाठी आवश्यक बाबी, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, संभाषण कौशल्य, सादरीकरण, प्रकल्प, तांत्रिक प्रशिक्षण इंटर्नशीप, स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी? हे करताना पालकांनी  कोणती भूमिका घ्यावी ? आदी करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची माहिती पालकांना दिली. यावेळी नवनाथ फुगारे, सौ. जामदार, सौ.अनुराधा आहिरे, संजय शिंदे, सौ.स्वाती लोटके, सुनील घाडगे, सौ.योगेश्वरी जोशी, सचिन बारटक्के यांच्यासह काही पालकांनी आपले विचार मांडले. वसतिगृह व्यवस्थापक प्रा. करण पाटील यांनी ‘स्वेरी अंतर्गत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ३ व विद्यार्थिनींसाठी ३ असे स्वतंत्र असलेल्या वसतिगृहाची आजची स्थिती आणि उद्याचे नियोजन यावर अभ्यासपूर्ण माहिती देवून ‘विद्यार्थी व विद्यार्थिनी हे अभियंता म्हणून बाहेर पडत असताना एक चांगला माणूस म्हणून समाजात वावरणे ही काळाची गरज ओळखून त्याप्रकारे स्वेरीतून शिक्षण दिले जात आहे.’ हे सांगितले. यावेळी कोणत्याही परिस्थितीचा बाऊ न करता अभियांत्रिकीची पदवी पूर्ण होण्यापूर्वीच गेट परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या गणेश कचरे व अमोल जाधव यांनी शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनाबाबत व केलेल्या परिश्रमाबाबत विचार व्यक्त केले. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजिलेल्या या पालक मेळाव्यात जवळपास १०० पालक, तसेच विभागातील प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. पालक मेळाव्याचे सूत्रसंचालन प्रा.जे.एस.शिंदे यांनी केले तर डॉ. एन.पी. कुलकर्णी यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad