भविष्यात इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे प्रभुत्व राहील
- विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे डॉ.मोहन आवारे
स्वेरी मध्ये एआयसीटीई अटल ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’चे आयोजन
पंढरपूर: ‘अभियांत्रिकी क्षेत्रात भविष्यात इतर शाखांपेक्षा इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखांचे महत्व वाढणार आहे. इलेक्ट्रिकल मध्ये वेगाने चार्ज होणाऱ्या, दीर्घकाळ टिकणाऱ्या, अधिक क्षमतेच्या बॅटरीबाबत संशोधन व निर्मिती तर मेकॅनिकल मध्ये स्वयंचलित वाहनांची कार्यक्षमता तसेच त्यांची अंतर्गत रचना व सुरक्षितता यांच्या संशोधनावर भर असणार आहे. एकूणच इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल क्षेत्रातील अभियंत्यांची भविष्यात या क्षेत्रातील कामगिरी उल्लेखनीय ठरणार आहे, हे मात्र नक्की!’ असे प्रतिपादन नागपूर येथील विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रा.डॉ.मोहन आवारे यांनी केले.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई), इंडिया यांच्या वतीने गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग व मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागांमार्फत ‘अॅडव्हान्स एनर्जी स्टोरेज: टेक्नॉलॉजी, इंटिग्रेशन अँड इम्प्लीमेंटेशन’ या विषयावर आयोजिलेल्या अटल एफडीपी तथा ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’च्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. मोहन आवारे बोलत होते. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.दीप्ती तंबोळी व मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.श्रीकृष्ण भोसले यांच्या नेतृत्वाखाली दि.१० डिसेंबर ते दि.१५ डिसेंबर २०२३ दरम्यान या एआयसीटीई अटल ‘एफडीपी’चे आयोजन केले आहे. डॉ. आवारे पुढे म्हणाले कि, ‘बॅटरी चार्जिंग आणि डिस चार्जिंग या बाबी भविष्यात अधिक महत्व प्राप्त करणार आहेत. तसेच एका चार्जिंग मध्ये जवळपास एक हजार किलोमीटर पर्यंत चार चाकी वाहने कशी धावू शकतील?’ याबाबत माहिती दिली. या एफडीपी मध्ये महाराष्ट्रातील, भारतातील व भारताबाहेरील नामांकित संस्थांमधील व औद्योगिक क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शक, संशोधक, शास्त्रज्ञ व प्राध्यापक वर्ग मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी संस्थेचे विश्वस्त एच.एम. बागल, समन्वयक डॉ. मोहन ठाकरे, प्रशासन अधिष्ठाता डॉ. रणजितसिंह गिड्डे, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, प्रा.दिगंबर काशीद, प्रा.अविनाश मोटे व प्राध्यापक वर्ग हे उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.नितीन कौटकर यांनी केले तर संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. अमरजित केने यांनी आभार मानले.