स्पर्धात्मक कार्यक्रमामुळे आत्मविश्वास वाढतो.
– सिग्नीफाय इनोव्हेशनचे चेतन विभूते
स्वेरीत ‘इ स्क्वेअर-लॉजिक २ के २२’ स्पर्धा संपन्न
पंढरपूर: ‘आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये सोलापूर जिल्ह्याचा विचार केला असता स्वेरीमधील शैक्षणिक पद्धतीचे व ‘पंढरपूर पॅटर्न’चे अनुकरण करण्यासारखे आहे. नियोजन असो अथवा ‘पंढरपूर पॅटर्न’ची शिक्षण पद्धती असो, याद्वारे बौद्धिक विकासात दिवसेंदिवस भर पडून विद्यार्थ्यांची प्रगती साधली जात आहे. त्याचे कारण म्हणजे ‘इ स्क्वेअर-लॉजिक २ के २२’ सारख्या टेक्निकल इव्हेंटमुळे विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना प्रेरणा मिळते आणि साहजिकच विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे उत्साह आणि स्टेज डेअरिंग वाढीस लागते.’ असे प्रतिपादन सिग्नीफाय इनोव्हेशनचे चेतन विभूते यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग’ आणि ‘इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग’ या दोन विभागांच्या संयुक्त विद्यमाने ‘इ स्क्वेअर-लॉजिक २ के २२’ या उपक्रमाच्या उदघाटन प्रसंगी सिग्नीफाय इनोव्हेशनचे चेतन विभूते हे विद्यार्थी व स्पर्धकांना मार्गदर्शन करत होते. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजिलेल्या ‘इ स्क्वेअर-लॉजिक २ के २२’ या उपक्रमाचे समन्वयक डॉ.व्ही.जी.काळे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा सांगितली. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार यांनी विभागाच्या यशाचा आलेख सादर केला तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.दीप्ती तंबोळी यांनी इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभागाने अल्पावधीत घेतलेल्या गरुडझेपेची माहिती दिली. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रा.अविनाश मोटे म्हणाले की, ‘भविष्यकाळात नोकरीच्या संधी ज्यावेळी उपलब्ध होतात त्यावेळी त्या विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट, संकल्पना या बाबींचा अधिक विचार करून बौद्धिक गोष्टींची नकळत चाचपणी केली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धात्मक कार्यक्रमात सहभाग घेणे महत्वाचे आहे.’ या राज्यस्तरीय उपक्रमात प्रोजेक्ट कॉम्पिटीशन, पेपर प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेंटेशन, वीग टू बझ व प्रोग्रामींग म्यानिया अशा प्रकाराच्या स्पर्धा झाल्या. सर्व स्पर्धांमधून यशस्वी गुणवंतांना एक हजार रुपये पासून पाच हजार रुपयापर्यंतची अशी दोन्ही विभागांची मिळून एकूण पन्नास हजार रुपयापर्यंतची रोख बक्षिसे व प्रमाणपत्रे अशा स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक देण्यात आली. या एक दिवसीय तंत्रस्पर्धेत राज्यातील विविध महाविद्यालयांतील जवळपास २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.एस.पी.स्वामी, प्रा.ए.ए. कदम, प्रा. एम.एस. बिश्वास यांच्यासह दोन्ही विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, दोन्ही विभागातील प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते. दिक्षा भट्टड, स्वराली जोशी, शिवराज मगर व मधुरा फलफले यांनी सूत्रसंचालन केले तर समन्वयक प्रा.एस.पी. स्वामी यांनी आभार मानले.