एसकेएन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूरच्या यांत्रिकी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची चव्हाण मोटर्स प्रा. लि., सोलापूर येथे औद्योगिक भेट.
पंढरपूर | प्रतिनिधी
एसकेएन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाच्या तृतीय वर्षातील (TY Mechanical Engineering) विद्यार्थ्यांसाठी चव्हाण मोटर्स प्रा. लि., अक्कलकोट रोड शाखा, सोलापूर येथे औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना वाहन उद्योगातील प्रत्यक्ष कामकाज, आधुनिक वाहन तंत्रज्ञान, वाहनांची देखभाल व दुरुस्ती प्रक्रिया तसेच वाहन सेवा व्यवस्थापन यांची माहिती करून देणे हा या औद्योगिक भेटीचा मुख्य उद्देश होता.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना वाहनांच्या सर्व्हिसिंग आणि देखभालीच्या विविध प्रक्रियांची माहिती मिळाली. वाहनांची तपासणी, तांत्रिक दोषांचे निदान, प्रतिबंधात्मक देखभाल, दुरुस्ती प्रक्रिया आणि वाहनांची कार्यक्षमता व सुरक्षितता कायम राखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती यांविषयी विद्यार्थ्यांना औद्योगिक दृष्टिकोनातून समजून घेण्याची संधी मिळाली. वाहनांच्या विविध यांत्रिक प्रणालींचे कार्य, त्यांची नियमित देखभाल आणि आधुनिक वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचे महत्त्व यांबाबतही विद्यार्थ्यांना माहिती मिळाली.
औद्योगिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना वर्गामध्ये शिकविल्या जाणाऱ्या अभियांत्रिकी संकल्पना आणि प्रत्यक्ष उद्योगातील कामकाज यांचा संबंध समजून घेता आला. वाहन सेवा क्षेत्रातील तांत्रिक कौशल्ये, अचूक निदान, कामातील गुणवत्ता, सुरक्षिततेचे नियम आणि ग्राहकाभिमुख सेवा व्यवस्थापन यांचे महत्त्व जाणून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. अशा भेटींमुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक ज्ञान, निरीक्षणक्षमता आणि उद्योगाभिमुख दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते.
या औद्योगिक भेटीच्या आयोजन व समन्वयासाठी डॉ. एस. आर. कोळी आणि प्रा. आर. के. शिंदे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. यांत्रिकी अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी आणि प्राचार्य डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
अभ्यासक्रमाशी संबंधित औद्योगिक भेटींमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामकाजाची ओळख होऊन त्यांच्या तांत्रिक ज्ञानाला व्यावहारिक अनुभवाची जोड मिळते. भविष्यातील औद्योगिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि कुशल अभियंता म्हणून विकसित होण्यासाठी अशा उपक्रमांचा विद्यार्थ्यांना निश्चितच लाभ होतो अशी भावना व्यक्त करण्यात आली.

