पंढरपूरला स्वतंत्र आरटीओ कार्यालयासाठी आ. समाधान आवताडे यांचा पाठपुरावा
आ.आवताडेंच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; परिवहन विभागाला तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
पंढरपूर/प्रतिनिधी
पंढरपूर येथे स्वतंत्र प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) सुरू करण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन पंढरपुरात स्वतंत्र आरटीओ कार्यालयास ‘विशेष बाब’ म्हणून मंजुरी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी परिवहन विभागाला मंजुरी देण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने लवकरच पंढरपुरात स्वतंत्र आरटीओ कार्यालय होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.
पंढरपूर हे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असून वर्षभरात चार प्रमुख एकादशी उत्सवांमुळे महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांतून लाखो भाविक येथे येतात. तसेच तीर्थक्षेत्र विकास आराखडा, अपर जिल्हाधिकारी व अपर पोलीस अधीक्षक कार्यालयांसह वाढता व्यापार, पर्यटन आणि राष्ट्रीय महामार्गांचे जाळे यामुळे पंढरपूरचा प्रशासकीय व आर्थिक विस्तार वेगाने होत आहे. पंढरपूरसह शेजारील तालुका परिसरातील वाहनांची संख्या अधिक आहे. वाहन नोंदणी, परवाना, कर भरणा आदी कामांसाठी नागरिकांना सोलापूरसाचे अंतर दूर होते.
पंढरपुरात स्वतंत्र आरटीओ कार्यालयामुळे परिसरातील नागरिकांना परिवहन विभागाच्या सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होऊन वाहन नोंदणी व परवाना प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होणार आहे. त्यामुळे पंढरपुरात आरटीओ कार्यालयास ‘विशेष बाब’ म्हणून मंजुरी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार समाधान आवताडे यांनी केली केली होती. या मागणीची प्रत परिवहन मंत्री प्रताप सर नाईक तसेच परिवहन विभागाचे आयुक्त यांना पाठविण्यात आली होती. या मागणीला मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने पंढरपुरात स्वतंत्र आरटीओ कार्यालय होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली.

