लोकमान्य विद्यालयात शालेय नाविन्यपूर्ण परिषदेअंतर्गत विद्यार्थ्यांना क्षेत्रभेट व संकल्पना निर्मितीचे मार्गदर्शन
पंढरपूर : पीएम श्री (PM SHRI) शाळा उपक्रमांतर्गत DICE (Development of Innovation and Entrepreneurship) कार्यक्रमाच्या शालेय नाविन्यपूर्ण परिषद (SIC) कृती-२ अंतर्गत लोकमान्य विद्यालय, पंढरपूर येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी सिंहगड कॉलेज, पंढरपूरचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी सर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना ‘क्षेत्रभेट आणि संकल्पना निर्मिती’ या विषयावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील समस्या, गरजा व उपलब्ध संधी यांचा अभ्यास करून त्यावर नाविन्यपूर्ण उपाययोजना व संकल्पना कशा विकसित कराव्यात, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षणशक्ती, सर्जनशील विचार, समस्या सोडविण्याची क्षमता आणि उद्योजकतेची भावना विकसित करण्यासाठी क्षेत्रभेटीचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अभय आराध्ये सर यांनी केले. यावेळी डॉ. स्वानंद कुलकर्णी सर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रिटेल विषयाचे व्यवसाय शिक्षक श्री. दयानंद शिंदे सर यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. अमोल लोखंडे सर यांनी केले.
या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना नव्या कल्पना प्रत्यक्ष जीवनातील समस्यांशी जोडून त्यातून नाविन्यपूर्ण संकल्पना विकसित करण्याची प्रेरणा मिळाली. विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण विचारांना, सर्जनशीलतेला आणि उद्योजकतेला चालना देणारा हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला.

