एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी,पंढरपूर येथे नवकल्पनांचा जागर, उद्योजकतेचा ध्यास; ‘विंग्ज २के२६’ मध्ये २८७ प्रकल्पांचे प्रदर्शन
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथे शनिवार, दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ रोजी वार्षिक प्रकल्प प्रदर्शन व स्पर्धा ‘WEENGS 2K26’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती, सर्जनशीलता, तांत्रिक कौशल्य आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या प्रदर्शनामध्ये द्वितीय, तृतीय आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी एकूण २८७ नावीन्यपूर्ण प्रकल्प सादर केले. विविध अभियांत्रिकी शाखांतील विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान, सामाजिक समस्या, शाश्वत विकास आणि भविष्यातील अभियांत्रिकी संधी यांवर आधारित संकल्पनांचे प्रभावी सादरीकरण केले. तज्ज्ञ परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे नावीन्यता, उपयुक्तता, कार्यपद्धती आणि तांत्रिक दृष्टिकोन या निकषांवर मूल्यमापन केले.
या कार्यक्रमासाठी सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई येथील सहयोगी अधिष्ठाता (प्रशासन) डॉ. प्रमोद बिडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना नवकल्पनांच्या माध्यमातून भविष्य घडविण्याचे आणि केवळ नोकरी शोधणारे न बनता रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनण्याचे आवाहन केले. अभियांत्रिकी शिक्षणातून प्राप्त झालेले ज्ञान प्रत्यक्ष जीवनातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी वापरणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जे. करांडे होते. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. के. जे. करांडे यांनी विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता संशोधन, नवकल्पना आणि प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्यातील संशोधन व उद्योजकीय क्षमता विकसित करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘WEENGS 2K26’ सारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आपल्या कल्पना प्रत्यक्ष प्रकल्पांमध्ये रूपांतरित करण्याची संधी मिळते, असेही त्यांनी सांगितले.
उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे कौतुक करून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नावीन्यपूर्ण विचार, संघभावना आणि व्यावहारिक ज्ञान विकसित होत असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाचे संयोजन प्रा. आर. के. शिंदे आणि प्रा. जी. डी. लकडे यांनी केले. सर्व विभागांचे प्रकल्प समन्वयक, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष योगदान दिले.
‘WEENGS 2K26’ हे प्रदर्शन विद्यार्थ्यांना आपल्या कल्पनांना प्रत्यक्ष स्वरूप देण्याची, संशोधनाची आणि उद्योजकतेची दिशा देणारे प्रभावी व्यासपीठ ठरले. २८७ प्रकल्पांच्या सहभागातून विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, संशोधनवृत्ती आणि तांत्रिक क्षमतेचे दर्शन घडले. नवकल्पना, निर्मिती आणि परिवर्तन या संकल्पनांना केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय दृष्टिकोन विकसित होण्यास प्रेरणा मिळाली.

