*पंढरपूर येथील नवीन अहिल्या पुलाच्या बांधकामास सिंहगड कॉलेजच्या विद्यार्थ्यांची अभ्यासभेट*
पंढरपूर : सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी दिनांक 24 सप्टेंबर 2026 रोजी पंढरपूर येथील नवीन अहिल्या पुलाच्या बांधकाम प्रकल्पास अभ्यासभेट देऊन आधुनिक बांधकाम तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
या अभ्यासभेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी पुलाच्या बांधकामातील प्रिस्ट्रेस्ड काँक्रिट गर्डर्सची स्टील बांधणी, स्ट्रेसिंग प्रक्रिया तसेच विविध तांत्रिक बाबींची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रिस्ट्रेस्ड काँक्रिट तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष बांधकामात वापर, गर्डरमधील स्टीलची मांडणी, स्ट्रेसिंगची कार्यपद्धती आणि या प्रक्रियेदरम्यान घेतली जाणारी आवश्यक काळजी याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी युनिक बिल्डर्सचे श्री. जयसिंह पवार व श्री. प्रणित गिरमे तसेच प्रकल्प व्यवस्थापक एन्विरोसेफ कंपनीच्या अभियंत्यांनी विद्यार्थ्यांना प्रकल्पाच्या विविध बांधकाम टप्प्यांबाबत मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष बांधकामस्थळी तांत्रिक प्रक्रिया समजून घेण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या सैद्धांतिक ज्ञानाला व्यावहारिक अनुभवाची जोड मिळाली.
या अभ्यासभेटीचे समन्वयक प्रा. गणेश लकडे यांनी नियोजन केले. प्रा. मिलिंद तोंडसे तसेच स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे या अभ्यासभेटीस मोलाचे सहकार्य लाभले.
विभागप्रमुख डॉ. यशवंत पवार, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी आणि प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही अभ्यासभेट यशस्वीपणे पार पडली.
अशा अभ्यासभेटींमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक बांधकाम तंत्रज्ञान, प्रत्यक्ष प्रकल्प व्यवस्थापन आणि संरचनात्मक बांधकाम प्रक्रियेचा अनुभव मिळतो. तसेच सैद्धांतिक ज्ञानाचा प्रत्यक्ष बांधकाम क्षेत्राशी संबंध जोडून विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक कौशल्यांच्या विकासास मोठी मदत होते.

