आ.आवताडे यांच्या पाठपुराव्याला यश; म्हैसाळ योजनेतून पाणी सोडले, मंगळवेढ्याच्या दक्षिण भागाला मोठा दिलासा
मंगळवेढा, प्रतिनिधी :
कृष्णा व पंचगंगा नदीतील पावसामुळे वाढलेले अतिरिक्त पाणी म्हैसाळ योजनेच्या कालव्यांद्वारे सोडण्याच्या आमदार समाधान आवताडे यांच्या मागणीला यश आले असून, संबंधित विभागाने म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
याबाबत आमदार समाधान आवताडे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत संबंधित यंत्रणेला आवश्यक आदेश देण्यात आले असून, म्हैसाळ योजनेच्या कालव्यातून पाणी सोडण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता मासाळ यांनी दिली.
आमदार आवताडे यांनी पत्रात नमूद केले होते की, कृष्णा व पंचगंगा नदी खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असून आगामी काळात पुराची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शेतकऱ्यांना पेरणी करता आलेली नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी पाणीटंचाई आणि पेरणीच्या दुहेरी संकटाचा सामना करत आहेत.
या पार्श्वभूमीवर कृष्णा व पंचगंगा नदीतील अतिरिक्त वाहून जाणारे पाणी म्हैसाळ योजनेच्या वितरिका क्रमांक १, वितरिका क्रमांक २ तसेच उमदी वितरिकेतून सोडल्यास परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्यासह जनावरांसाठी व शेतीसाठी मोठा दिलासा मिळेल, अशी मागणी करण्यात आली होती. गतवर्षी खरीप व रब्बी हंगामात मंगळवेढा तालुक्यासाठी म्हैसाळ योजनेचे एक थेंबही पाणी मिळाले नव्हते. त्यामुळे सध्या कोरडे पडलेले कालवे भरल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे
निरा-भाटघर (NRBC) कालव्यातूनही पंढरपूर तालुक्याला पाणी
वीर धरण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून सुमारे ६,००० क्यूसेक पाणी निरा नदीत सोडण्यात आले आहे. हे पाणी निरा-नरसिंगपूरमार्गे भीमा नदीत मिळणार असून पुढे कर्नाटकाच्या दिशेने वाहून जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी केवळ दोन तास वीजपुरवठा मिळत असल्याने पाइपलाइन भरत नसल्याची बाब आमदार समाधान आवताडे यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानुसार संबंधित भागात दोन दिवसांत आठ तास वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
याशिवाय, वीर धरण भरत आल्याने पंढरपूर तालुक्यातील कॅनॉलच्या लाभक्षेत्रातील गावांना तातडीने सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणीही आमदार आवताडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या मागणीचीही दखल घेत पंढरपूर तालुक्यातील कालव्यांमध्ये पाणी सोडण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पावसाअभावी चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे चित्र आहे.

