*सिंहगड पंढरपूर येथे काँक्रिट मिक्स डिझाइन आणि एसपीएसएस सॉफ्टवेअर या विषयावर मूल्यवर्धित कार्यक्रम संपन्न*
पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत तृतीय वर्ष बी.टेक. विद्यार्थ्यांसाठी "काँक्रिट मिक्स डिझाइन आणि एसपीएसएस सॉफ्टवेअर" या विषयावर चार दिवसीय मूल्यवर्धित कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम दि. २८ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमामध्ये तृतीय वर्ष बी.टेक. स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना आधुनिक काँक्रिट मिक्स डिझाइनची तत्त्वे, भारतीय मानकांनुसार मिश्रण रचना, विविध दर्जाच्या काँक्रिटचे प्रमाण निश्चिती, सुपरप्लास्टिसायझरचा वापर, तसेच प्रयोगशाळेमध्ये प्रत्यक्ष काँक्रिट मिक्स डिझाइनची प्रात्यक्षिके देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व टिकाऊ काँक्रिट निर्मितीची सखोल माहिती प्राप्त झाली.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांना संशोधनासाठी उपयुक्त असलेल्या एसपीएसएस या सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये माहिती संकलन, डेटा एन्ट्री, वर्णनात्मक सांख्यिकी (डिस्क्रिप्टिव स्टॅटिस्टिक्स), सहसंबंध (कोरिलेशन), प्रतिगमन विश्लेषण (रिग्रेशन ऍनालिसिस), परिकल्पना चाचण्या ( हायपोथिसिस टेस्टिंग) तसेच संशोधनातील सांख्यिकीय निष्कर्षांचे विश्लेषण याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष उदाहरणांवर आधारित सराव करून संशोधन व डेटा विश्लेषणासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात केली.
या मूल्यवर्धित कार्यक्रमासाठी अल्ट्राटेक आरएमसी येथील गुणवत्ता नियंत्रण विभागाचे प्रमुख श्री. वैभव जगताप आणि प्रा. अजित करांडे यांनी काँक्रिट मिक्स डिझाइन विषयावर तर प्रा. ओंकार बिडकर यांनी एसपीएसएस सॉफ्टवेअर विषयावर मार्गदर्शन केले. तज्ज्ञांनी उद्योग व संशोधन क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामकाजातील अनुभवावर आधारित प्रशिक्षण दिले.
कार्यक्रमासाठी स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. यशवंत पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. जी. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांनी आधुनिक तांत्रिक सॉफ्टवेअर आणि संशोधन साधनांचे ज्ञान आत्मसात करून उद्योग व उच्च शिक्षण क्षेत्रातील संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी अशा मूल्यवर्धित कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे तांत्रिक ज्ञान, संशोधन क्षमता आणि उद्योगाभिमुख कौशल्ये विकसित होत असून, त्यांच्या रोजगारक्षमतेत निश्चितच वाढ होत असल्याचे सांगून स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक म्हणून प्रा. अजित करांडे यांचे आणि स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

