*पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात एआयसीटीई स्पॉन्सर्ड आयडिया लॅबचे उत्साहात उद्घाटन*
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे एआयसीटीई (AICTE) प्रायोजित आयडिया लॅबचे उद्घाटन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, नवोपक्रमांना चालना देण्यासाठी आणि स्टार्टअप तसेच संशोधनाची संस्कृती बळकट करणे या उद्देशाने या अत्याधुनिक नवकल्पना प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आली आहे.
आयडिया लॅब ही विद्यार्थ्यांना “आयडिया ते उत्पादन” या संकल्पनेवर काम करण्यासाठी सक्षम बनवणारी सुविधा असून, येथे थ्री-डी प्रिंटिंग, आयओटी , रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, फॅब्रिकेशन यांसारखी आधुनिक साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या लॅबमुळे विद्यार्थ्यांना आंतरशाखीय पद्धतीने प्रकल्प विकसित करण्याची संधी मिळणार आहे.
उद्घाटनानंतर आयोजित मार्गदर्शन सत्रात विद्यार्थ्यांना नवोपक्रम, स्टार्टअप, प्रकल्प, पेटंट्स आणि उद्योग क्षेत्रातील संधींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. अधिष्ठाता डॉ. चेतन पिसे यांनी आयडिया लॅबची संकल्पना, इतिहास आणि उद्दिष्टे स्पष्ट केली तसेच समन्वयकांची भूमिका विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे यांनी विद्यार्थ्यांना प्रकल्पांचे व्यावसायीकरण, पेटंट्स आणि एआयसीटीई अंतर्गत संधी यावर मार्गदर्शन करताना “नवकल्पनांना प्रत्यक्ष उत्पादनात रूपांतर करणे” यावर विशेष भर दिला.
उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी आयडिया लॅबच्या उभारणीत माजी विद्यार्थी, सीएसआर निधी आणि उद्योग क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान अधोरेखित केले. विविध उद्योजक आणि दानशूर व्यक्तींनी दिलेल्या सहकार्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. संदीप अनासने यांनी आयडिया लॅबचा इतिहास आणि महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी एमआयटी, बोस्टन येथील फॅब लॅबच्या यशस्वी उदाहरणाचा संदर्भ देत नवोपक्रम, जिज्ञासा आणि तांत्रिक कौशल्य विकसित करण्याचे आवाहन केले.
सन्माननीय अतिथी श्री. किशोर चंडक यांनी विद्यार्थ्यांना प्रयोग करण्यास प्रोत्साहन देत सांगितले की, “अपयशातूनच यशस्वी प्रकल्प घडतात.” त्यांनी टीमवर्क, प्रयोगशीलता आणि प्रयोगशाळेचा अधिकाधिक वापर करण्याचा सल्ला दिला.
सन्माननीय अतिथी डॉ. राजशेखर येळीकर यांनी विद्यार्थ्यांना स्टार्टअप्सचे महत्त्व, प्रकल्पांमधून नवकल्पना विकसित करण्याची गरज आणि पेटंट्सद्वारे कल्पनांचे संरक्षण याबाबत मार्गदर्शन केले. तसेच उद्योग क्षेत्रातील संधी व कौशल्यविकासावर भर देत, विद्यार्थ्यांनी नोकरी शोधण्यापेक्षा उद्योजक बनण्याचा दृष्टिकोन ठेवावा असे त्यांनी आवाहन केले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना इंटर्नशिपच्या संधी, उद्योग क्षेत्रातील प्रवास तसेच केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. देशातील स्टार्टअप इकोसिस्टम आणि शासकीय योजनांमधील संधींचाही आढावा घेण्यात आला.
या आयडिया लॅबमध्ये “शिक्षण-अध्यापन परिसंस्था” या संकल्पनेवर आधारित वातावरण तयार करण्यात आले असून, विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, संशोधन वृत्ती आणि उद्योजकता विकसित करण्यावर भर दिला जात आहे. तसेच, ही लॅब उद्योग आणि समाज यांच्यातील दुवा म्हणून कार्य करणार आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्टार्टअप, संशोधन आणि सामाजिक जाणीव निर्माण होऊन ते भविष्यात जबाबदार आणि नवोन्मेषी नागरिक बनतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी आणि अधिष्ठाता डॉ. चेतन पिसे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रा.अविनाश हराळे, प्रा.लक्ष्मीकांत जोशी, प्रा.सचिन घाडगे, प्रा.मनोज कोळी, प्रा. प्रदीप व्यवहारे, स्मिता पिसे व गणेश माळी यांनीही मोलाचे योगदान दिले. तसेच विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून प्रथमेश आराध्ये, अनुराग पवार, पृथ्वीराज जाधव व श्रेयश दामोदरे यांनीही मोलाचे सहकार्य केले.

