पंढरपूर सिंहगडमध्ये संगणक विज्ञान विभागामध्ये “प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग : कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील संधी” या विषयावर व्याख्यान*

 *पंढरपूर सिंहगडमध्ये संगणक विज्ञान विभागामध्ये “प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग : कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील संधी” या विषयावर व्याख्यान*



पंढरपूर | प्रतिनिधी

पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागामध्ये “प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग : कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील संधी” या विषयावर आमंत्रित व्याख्यान उत्साहात संपन्न झाले. बुधवार, दि. १८ मार्च २०२६ रोजी आयोजित या कार्यक्रमाची माहिती विभागप्रमुख डॉ. एस. व्ही. पिंगळे यांनी दिली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी एआय/एमएल अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या सौ. वैष्णवी जाधव (एपेक्सॉन इंडिया प्रा. लि., पुणे) या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी “प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग” या संकल्पनेचे सविस्तर विश्लेषण केले. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालींना योग्य व अचूक सूचना (प्रॉम्प्ट) देऊन अपेक्षित व गुणवत्तापूर्ण परिणाम कसे मिळवता येतात, याचे त्यांनी उदाहरणांसह स्पष्टीकरण दिले. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रांमध्ये स्पष्ट सूचना देणे, संदर्भ देणे, टप्प्याटप्प्याने विचार मांडणे (चेन-ऑफ-थॉट) तसेच पुनरावृत्ती करून उत्तरे अधिक सुधारित करणे यांसारख्या पद्धतींचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

यासोबतच जनरेटिव्ह कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांचा प्रभावी वापर, संवादात्मक प्रणालींसोबत काम करण्याच्या आधुनिक पद्धती, तसेच मशीन लर्निंग आणि एआयमधील विविध उपयोग क्षेत्रांबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. आरोग्य, शिक्षण, उद्योग, सॉफ्टवेअर विकास, डेटा विश्लेषण आदी क्षेत्रांमध्ये एआयचा वाढता वापर आणि त्यामध्ये प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगची महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी अधोरेखित केली.

तसेच एआय क्षेत्रातील करिअरच्या संधी, आवश्यक तांत्रिक कौशल्ये, उद्योगातील नव्या प्रवृत्ती आणि भविष्यातील संधी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या सत्रामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची दिशा समजून घेण्यास मोठी मदत झाली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी वैष्णवी जाधव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या व्याख्यानास विभागातील प्राध्यापक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक प्रा. एस. एस. भिमदे यांच्यासह विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad