*पंढरपूरच्या सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात “आंतरराष्ट्रीय महिला दिन” उत्साहात साजरा*
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पंढरपूर येथे ९ मार्च २०२६ रोजी ए.सी. सेमिनार हॉलमध्ये “आंतरराष्ट्रीय महिला दिन 2K26- आपली वाटचाल, आपला विजय” या शीर्षकाखाली आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम महाविद्यालयातील सावित्रीबाई फुले गर्ल्स फोरम यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयातील सर्व अभियांत्रिकी शाखांतील विद्यार्थिनींनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी प्रस्तावना करताना महिला सक्षमीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षण, कौशल्य आणि आत्मविश्वास यांच्या बळावर विद्यार्थिनींनी प्रत्येक क्षेत्रात पुढे जावे, असे आवाहन त्यांनी केले. सदरील कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफीसर डॉ.समीर कटेकर तसेच आंमत्रित माजी विद्यार्थीनींचे पालक देखील उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींना मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये कु. सिद्धी केसकर (इंडियन इंन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट, रोहतक), कु. प्रियांका माने (आरटीओ, सोलापूर), कु. स्वाती वाघमारे (आयटी ऑफिसर - फेज I, बँक ऑफ महाराष्ट्र), कु. स्वप्नाली जाधव (सहाय्यक अभियंता, पंढरपूर), कु. नंदिनी भोसले(उद्योजक), कु. वर्षा भोसले (भूमापनकार) तसेच कु. सुमित्रा सांगोलकर (गेट परीक्षा उत्तीर्ण व सिव्हिल इंजिनिअरिंगमधील विद्यापीठीय स्तरावरील सुवर्णपदक विजेती) यांचा समावेश होता.
या मान्यवरांनी विद्यार्थिनींसमोर आपल्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रवासातील अनुभव मांडले. शिक्षणकाळातील परिश्रम, करिअरमधील आव्हाने आणि त्यांवर मात करून मिळवलेले यश याबाबत त्यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनीही उत्साहाने प्रश्न विचारत संवाद साधला. या चर्चेतून विद्यार्थिनींना करिअर नियोजन, आत्मविश्वास वाढवणे आणि नेतृत्वगुण विकसित करण्याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी शितोळे (द्वितीय वर्ष, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग) आणि स्नेहा कदम (तृतीय वर्ष, सिव्हिल इंजिनिअरिंग) यांनी केले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून सौ. अंजली सी. पिसे, अध्यक्षा सावित्रीबाई फुले गर्ल्स फोरम यांनी नियोजन व मार्गदर्शन केले. तसेच सौ. अंजली ए. चांदणे व गर्ल्स फोरमच्या सर्व सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष सहकार्य केले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थिनींना विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधींबाबत सविस्तर माहिती मिळाली. अभियांत्रिकी, प्रशासन, बँकिंग, आयटी, बांधकाम तसेच स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून करिअर घडविण्याच्या विविध मार्गांबाबत मान्यवरांनी मार्गदर्शन केले. उच्च शिक्षण, कौशल्यविकास, स्पर्धा परीक्षा, उद्योग क्षेत्रातील संधी आणि सरकारी सेवेत प्रवेश याबाबत विद्यार्थिनींना उपयुक्त माहिती देण्यात आली. यामुळे विद्यार्थिनींमध्ये करिअर नियोजनाबाबत जागरूकता निर्माण झाली तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढून भविष्यात नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

