*स्त्रीशिक्षणाच्या क्रांतीची मशाल : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात विनम्र अभिवादन*
पंढरपूर | प्रतिनिधी
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे मंगळवार, दि. १० मार्च २०२६ रोजी भारतातील स्त्रीशिक्षणाच्या आद्य प्रवर्तक, समाजसुधारक व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. चेतन पिसे, डॉ. संपत देशमुख, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. समीर कटेकर तसेच महाविद्यालयातील सर्व महिला वर्ग यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करण्यात आले, अशी माहिती प्राचार्य डॉ. करांडे यांनी दिली.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक अत्यंत महत्त्वाच्या आणि निर्भीड व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जातात. स्त्रीशिक्षण, सामाजिक समानता, विधवांचा सन्मान आणि जातीय विषमता निर्मूलन या क्षेत्रांत त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. समाजातील अन्यायकारक रूढी-परंपरांविरुद्ध त्यांनी ठामपणे लढा दिला. सन १८४८ मध्ये पुणे येथील भिडेवाडा येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सहकार्याने भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू करून त्यांनी स्त्रीशिक्षणाच्या क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. प्रतिकूल सामाजिक परिस्थिती, अपमान, बहिष्कार आणि विरोध यांचा सामना करूनही त्यांनी शिक्षणाचा वसा अखंडपणे पुढे नेला. स्त्रीशिक्षणाची चळवळ उभी करून त्यांनी हजारो महिलांच्या जीवनाला नवी दिशा दिली.
सावित्रीबाई फुले या केवळ समाजसुधारकच नव्हे, तर एक संवेदनशील लेखिका व कवयित्री देखील होत्या. सावित्रीबाई यांनी आपले पती ज्योतीराव फुले यांच्या सहकार्याने समाजातील अंधश्रद्धा, जातीभेद आणि अन्यायाविरुद्ध लढा दिला. १८९७ मध्ये प्लेगच्या साथीच्या काळात आजारी लोकांची सेवा करत असताना त्यांना संसर्ग झाला आणि त्यांचे निधन झाले.
त्यांचे जीवन आपल्याला शिक्षण, समानता आणि समाजसेवेची प्रेरणा देते. त्यांच्या विचारांवर चालणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
या अभिवादन कार्यक्रमप्रसंगी प्रा. अंजली पिसे, वैष्णवी उत्पात, निशा करांडे, संगीता कुलकर्णी, सारीका नवले, रुपाली खंडागळे, तेजस्वी झरकर, अमृता माळी, सोनाली गोडसे, निखत खान, वंदना माळी, माधुरी वाघमारे, स्मिता पिसे, सारीका निकम, संध्या शिंदे, तसेच प्रा. शिवाजी पवार, प्रा. समाधान माळी, एकनाथ इंगवले, नवनाथ माळी, विकास इतापे, पांडुरंग परचंडे, संजय बनकर अंकुश अवताडे, गणेश माळी, विनायक माळी यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

