*पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण स्नेहमेळावा*
पंढरपूर (प्रतिनिधी) : कोर्टी येथील एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरींग येथे रविवार दि. १ मार्च २०२६ रोजी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विविध वर्षांमध्ये शिक्षण पूर्ण केलेले अनेक माजी विद्यार्थी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक वर्षांनंतर पुन्हा एकत्र येण्याची संधी मिळाल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि महाविद्यालयीन जीवनातील अनुभवांना नवी उजळणी मिळाली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाच्या वतीने माजी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा, संशोधन व नवोपक्रम उपक्रमांचा तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या आधुनिक सुविधा आणि उद्योग क्षेत्राशी असलेल्या सहकार्याचा आढावा सादर करण्यात आला.
या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजक खेळ (फनी गेम्स) यांचे आयोजन करण्यात आले होते. माजी विद्यार्थी आणि उपस्थितांनी या कार्यक्रमांचा मनमुराद आनंद घेतला. कार्यक्रमादरम्यान सहभागी माजी विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्हे देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उपस्थितांसाठी स्वादिष्ट भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती.
या स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी आपल्या व्यावसायिक जीवनातील अनुभव विद्यार्थ्यांशी शेअर केले. उद्योग क्षेत्रातील वाढत्या संधी, कौशल्यविकासाचे महत्त्व तसेच बदलत्या तांत्रिक प्रवाहांशी जुळवून घेण्याची गरज याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. काही माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याची तयारीही व्यक्त केली.
या कार्यक्रमामुळे माजी विद्यार्थी आणि महाविद्यालय यांच्यातील स्नेहबंध अधिक दृढ झाले. तसेच विद्यार्थ्यांना करिअरविषयक मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळण्यास मोठी मदत झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य, उपप्राचार्य,प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

