स्वेरीत राष्ट्रीय स्तरावरील ‘चक्रव्यूह २.०’ संपन्न
सलग ३६ तास चालला हा उपक्रम
पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विभागामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील ‘चक्रव्यूह २.०’ हा सलग ३६ तासांचा तांत्रिक संशोधनपर उपक्रम संपन्न झाला. यामध्ये भारतातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. स्वेरीच्या वतीने सर्व सहभागी विद्यार्थ्यांसाठी राहण्याची व भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे बाहेरून आलेले स्पर्धक समाधानाने परतले.
दीपप्रज्वलन आणि प्रास्ताविकानंतर सर्व मान्यवरांनी ‘चक्रव्यूह २.०’ च्या पत्रकाचे अनावरण करून या तांत्रिक स्पर्धेची सुरुवात केली. कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. सुनीता साळसिंगिकर ह्या होत्या. त्यांच्यासह विभागप्रमुख डॉ. पी. ए. सातारकर व्यासपीठावर उपस्थित होत्या. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रा. अविनाश मोटे यांनी ‘चक्रव्यूह २.०’ सारख्या संशोधन व स्पर्धात्मक कार्यक्रमांचे महत्त्व तसेच नोकरीच्या संधींसाठी आणि कौशल्य विकासासाठी असे उपक्रम कसे उपयुक्त ठरतात याबद्दल बहुमोल मार्गदर्शन केले. यानंतर तब्बल ३६ तासांनंतर बक्षीस वितरण समारंभ पार पडला. या समारंभाला यशस्वी उद्योजक व स्वेरीचे माजी विद्यार्थी बापू अरकस व प्रदीप गाडेकर हे अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी शालेय अभ्यासक्रमासोबतच अशा संशोधनपर कार्यक्रमांमध्ये प्रकल्प करण्याचे महत्त्व त्यांच्या जीवनातील उदाहरणांमधून सर्वांना पटवून दिले. या ‘चक्रव्यूह २.० ’ उपक्रमामध्ये हॅकाथॉन, प्रोजेक्ट डेव्हलपमेंट व प्रेझेंटेशन, यूआय/ यूएक्स डिझाईन, कोडिंग व डिबगिंग स्पर्धा, तांत्रिक प्रश्नमंजुषा तसेच आयडिया प्रेझेंटेशन अशा विविध तांत्रिक स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समस्यांवर उपाय शोधण्याचा अनुभव, टीमवर्क व नेतृत्व गुणांचा विकास, वेळेचे नियोजन, तसेच इंडस्ट्री-ओरिएंटेड कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळाली. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांच्या करिअरच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वाटप करण्यात आले. सर्व विजेत्यांना मिळून एकूण रोख रुपये ८० हजार, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्रे देण्यात आली. या उपक्रमात महाराष्ट्रासह लगतच्या राज्यातील जवळपास ६०० संशोधक विद्यार्थी स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम प्रमुख श्रीप्रिया कारंडे, मुख्य संयोजक दिपक पवार, तसेच सह-मुख्य संयोजक ओंकार भोसले यांच्यासह समन्वयक प्रा. व्ही. डी. जाधव, इतर प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार यांचा सहकार्याने आणि उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार व कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाच्या प्रमुख डॉ.प्राजक्ता सातारकर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला. यावेळी प्लेसमेंट विभागाचे प्रा. अविनाश मोटे, डॉ. सचिन खोमणे इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थिनी समन्वयक गौरी माने व प्रणाली इंगोले यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. सारीका हजारे यांनी आभार मानले.

