*पंढरपूर सिंहगडमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता व इंडस्ट्री 4.0 प्रोटोटाइप्स एक्स्पो उत्साहात*
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी, पंढरपूर येथील इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल (आयआयसी) आणि एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट सेल (ईडीपी) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता “कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम सोल्यूशन एक्स्पो : कृत्रिम बुद्धिमत्ता व इंडस्ट्री 4.0 प्रोटोटाइप्ससाठी प्रात्यक्षिक दिवस” हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालयाला एनबीए मान्यता तसेच नॅक मूल्यांकन ‘A+’ दर्जा प्राप्त असून या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या एक्स्पोला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, अशी माहिती प्राचार्य डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे यांनी दिली.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विनायक जगताप एस.के.एन. सिंहगड महाविद्यालय, पंढरपूर उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि इंडस्ट्री 4.0 या आधुनिक तंत्रज्ञानामुळे उद्योग, शेती, आरोग्य व शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या परिवर्तनाचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण प्रोटोटाइप्सचे कौतुक करत त्यांनी संशोधन, नवोन्मेष आणि उद्योजकतेकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले.
या एक्स्पोमध्ये विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता व इंडस्ट्री 4.0 संकल्पनांवर आधारित विविध प्रकल्पांचे प्रात्यक्षिक सादर केले. मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्स, स्मार्ट ऑटोमेशन, रोबोटिक्स आणि डेटा अॅनालिटिक्स यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करून तयार करण्यात आलेले प्रोटोटाइप्स विशेष आकर्षण ठरले. यामध्ये स्मार्ट होम ऑटोमेशन प्रणाली, एआय-आधारित पिकांची रोगनिदान प्रणाली, स्मार्ट ट्रॅफिक व्यवस्थापन मॉडेल, इंडस्ट्रियल सेफ्टी मॉनिटरिंग सिस्टीम, ऊर्जा व्यवस्थापनासाठी आयओटी-आधारित उपाय तसेच स्मार्ट हेल्थ मॉनिटरिंग प्रणाली यांसारखे उद्योगस्नेही व सामाजिक समस्यांवर उपाय सुचविणारे प्रकल्प सादर करण्यात आले.
कार्यक्रमाच्या मार्गदर्शन व आयोजनात डॉ. अतुल एस. आराध्ये (इन्क्युबेशन प्रभारी) तसेच उपप्राचार्य व आय. आय. सी. अध्यक्ष डॉ. स्वानंद जी. कुलकर्णी यांचे विशेष योगदान लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना संशोधन, स्टार्ट-अप संस्कृती आणि तांत्रिक नवकल्पनांच्या माध्यमातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहित केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. एक्स्पोमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी, प्राध्यापक तसेच उद्योजकांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील प्रा. एम. व्ही. तोंडसे, संगणक विभागातील प्रा. डी. पी. भोसले, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग विभागातील प्रा. ए. एस. शिंदे, विद्युत अभियांत्रिकी विभागातील प्रा. डी. एम. कोरके तसेच यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील प्रा. एल. डी. जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

