*सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी येथे प्रथम वर्ष विद्यार्थी पालक मेळावा व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न*
पंढरपूर : सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी मध्ये प्रथम वर्ष विद्यार्थी पालक मेळावा तसेच गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. कार्यक्रमास पालक, विद्यार्थी व प्राध्यापकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याची माहिती दिली.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉ. अनिल निकम, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, पालक प्रतिनिधी श्री. विवेक बडवे व सौ. सोनाली शिंगटे यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली.
प्रास्ताविकात डॉ. अनिल निकम यांनी पालक मेळाव्याचे उद्दिष्ट स्पष्ट करत प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या पहिल्या सत्राच्या निकालाचा आढावा सादर केला. त्यांनी अभिमानाने नमूद केले की, प्रथम वर्षातील एकूण ७१ विद्यार्थ्यांनी १० पैकी १० ग्रेड पॉईंट मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली. विद्यार्थ्यांचे परिश्रम, पालकांची साथ आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच हा यशस्वी निकाल शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी पालकांना मार्गदर्शन करताना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे फायदे स्पष्ट केले. महाविद्यालयामार्फत उपलब्ध करून दिलेल्या विविध व्यासपीठांचा योग्य उपयोग करून विद्यार्थी आपले व्यक्तिमत्त्व प्रभावीपणे घडवू शकतात, यावर त्यांनी प्रकाश टाकला. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध रोजगार संधी व प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती दिली.
पालक प्रतिनिधी सौ. सोनाली शिंगटे यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी मिळणाऱ्या संधींचा पुरेपूर लाभ घेऊन उज्ज्वल भविष्य घडवावे, असे आवाहन केले. पालक व शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी सदैव तत्पर असतात, असे त्यांनी नमूद करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी सध्याच्या स्पर्धात्मक युगाची जाणीव करून देत विद्यार्थ्यांनी वेळेचे योग्य नियोजन, शिस्त आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांच्या जोरावर आपले ध्येय साध्य करावे, असे मार्गदर्शन केले. जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर यश निश्चित मिळते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी प्रथम वर्षातील शुभांगी घाडगे, अनुष्का पांडे, अमृता वसेकर, प्रतीक्षा गायकवाड, स्नेहल बंडगर, श्रुती राऊत, सानिया नलवडे, कार्तिकी कोरके व सिद्धार्थ शिंदे यांनी आपले अनुभव व मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवाजी पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. दिपक गानमोटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

