*सिंहगड महाविद्यालय, पंढरपूर येथे शिक्षक दिनानिमित्त रोटरी क्लब, पंढरपूर यांच्या वतीने “आदर्श शिक्षक व राष्ट्रउत्थान पुरस्कार ” सोहळा उत्साहात संपन्न*
पंढरपूर : एस.के.एन.सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरींग या महाविद्यालयामध्ये रोटरी क्लब, पंढरपूर यांच्या वतीने राष्ट्रउत्थान पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याची माहिती महाविदयालाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने झाली, यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करत कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. प्रमुख पाहुण्यांची ओळख कु. सानिका बाबर हिने करून दिली.
या शिक्षक सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे डॉ. मोहन देशपांडे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या विचारप्रवर्तक व्याख्यानात शिक्षकांच्या आजीवन शिक्षण घेणाऱ्या आणि मार्गदर्शक म्हणून असलेल्या भूमिकेवर भर दिला.
डॉ. मोहन देशपांडे यांनी नमूद केले की शिक्षक आणि विद्यार्थी यांचा नाते केवळ शैक्षणिक यशापुरते मर्यादित नसून ते प्रतिबद्धता, मार्गदर्शन आणि मूल्यांवर आधारित असावे. “खरे शिक्षक कधीही निवृत्त होत नाहीत; ते ज्ञान आणि उदाहरणाद्वारे जीवन आणि समाज घडवत राहतात” असे ते म्हणाले.
महाविद्यालयाच्या वतीने या कार्यक्रमात २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी आदर्श शिक्षक पुरस्कार महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अल्ताफ मुलाणी आणि प्रा. प्रदीप व्यवहारे यांना प्रदान करण्यात आला.
याचबरोबर, पंढरपूर रोटरी क्लबच्या वतीने स्थापन केलेले राष्ट्रउत्थान पुरस्कार, पंढरपूर परिसरातील पाच प्रतिष्ठित शिक्षकांना देण्यात आला. यामध्ये जि.प.प्राथमिक शाळा, औंढी, ता.मोहोळ येथील उपशिक्षक श्री हनुमंत सिदराम बनसोडे, टॉपर्स अकॅडमी पंढरपूरचे सुप्रसिध्द शिक्षक श्री गणेश धांडोरे, सिंहगड महाविद्यालयातील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी, कवठेकर प्रशाला, नाथ चौक, पंढरपूर येथील मुख्याध्यापक श्री विठ्ठल यादव पाटील आणि द.ह. कवठेकर, पंढरपूर येथे कार्यरत असणा-या शिक्षीका श्रीमती ज्योती (प्रज्ञा) मिलिंद कुलकर्णी ( ह.भ.प. वा. ना. उत्पात सर यांच्या कन्या ) या शिक्षकांना सन्मानीत करण्यात आले. हा सन्मान सोहळा फक्त शिक्षकांचा गौरवच करत नाही तर मार्गदर्शन आणि आजीवन शिक्षण या शाश्वत मूल्यांचेही स्मरण करून देतो. शिक्षकांच्या अथक परिश्रमांना व शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या भूमिला यामुळे उजाळा मिळतो.
या पुरस्कारांची घोषणा महाविद्यालयाचे प्राचार्य आणि माजी रोटरी अध्यक्ष डॉ. कैलाश करांडे यांनी केली, तर पुरस्कारांचे वितरण प्रमुख पाहुणे डॉ. मोहन देशपांडे, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. वैभव सादिगले आणि सचिव श्री मयूर परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सानिका बाबर, कु. अस्मिता चव्हाण आणि कु. निलोफर शेख यांनी अत्यंत सुंदर व शिस्तबद्ध पद्धतीने केले. समारोप प्रसंगी रोटरी क्लबचे सचिव श्री. मयूर परिचारक यांनी उपस्थित सर्व रोटरी क्लबचे सदस्य, मान्यवर शिक्षक, महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी यांचे आभार मानले.

