संतोष सरकटे यांची ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) पदावर निवड
पाचव्यांदा शासकीय सेवेत यश कार्यतत्परता व चिकाटीचे फळ
प्रतिनिधी
मंठा तालुक्यातील तळणी येथील ग्रामपंचायत कर्मचारी रमेश सरकटे यांचे चिरंजीव संतोष रमेशराव सरकटे यांनी शासकीय सेवेत मोठे यश मिळवत जालना जिल्हा महसूल विभागात ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) पद मिळवले आहे. या उल्लेखनीय यशामुळे तळणी व परिसरात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे..
संतोष सरकटे यांनी अत्यल्प काळात सलग पाच वेळा शासकीय सेवेत यश मिळवून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. मागील वर्षभरातील त्यांच्या कामगिरीकडे पाहिले असता प्रथम आरोग्य विभागात अभिलेखपाल, त्यानंतर हिंगोली जिल्ह्यात आरोग्य विभागात शिपाई, पुढे जालना जिल्ह्यात आरोग्यसेवक, जिल्हा परिषद वर्धा येथे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी अशा विविध पदांवर त्यांनी निवड मिळवली. अखेरीस जालना जिल्हा महसूल विभागातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) पदावर नियुक्ती मिळवत त्यांनी शासकीय सेवेत पाचव्यांदा यश संपादन केले आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण यशामागे कार्यतत्परता, चिकाटी, आत्मविश्वास आणि अखंड मेहनत आहे, असे मित्रपरिवार व ग्रामस्थ सांगतात. ग्रामीण भागातील तरुणांसाठी संतोष सरकटे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहेत, अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली. ग्रामस्थ, नातेवाईक व मित्रमंडळींनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. गावाच्या प्रगतीसाठी व समाजहितासाठी ते निश्चितच मोलाची सेवा बजावतील, असा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे.
सौ. दैनिक जालना टाईम्स

