*पंढरपूर सिंहगडमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व क्वांटम कम्प्युटिंगवरील ऑनलाईन मार्गदर्शन सत्र उत्साहात संपन्न*
पंढरपूर (प्रतिनिधी):
पंढरपूर येथील सिंहगड इन्स्टिट्यूट मध्ये संगणक अभियांत्रिकी विभाग आणि स्टुडंटस असोसिएशन ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरींग (ACSES) यांच्या संयुक्त विद्यमाने ACSpire ऑनलाईन व्याख्यानमालिका अंतर्गत गुरुवार, दि. २८ ऑगस्ट २०२५ रोजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स व क्वांटम कम्प्युटिंग या विषयावर एक विशेष ऑनलाईन मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले, अशी माहिती विभागप्रमुख डॉ. सुभाष पिंगळे यांनी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात संगणक अभियांत्रिकी विभागाच्या वतीने प्रास्ताविक करून करण्यात आली. मान्यवरांचे स्वागत करून सत्रास सुरुवात झाली.
या सत्रात IBM Quantum India चे लीडर व IBM Master Inventor डॉ. एल. वेंकट सुब्रमण्यम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. सुब्रमण्यम यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स व क्वांटम कम्प्युटिंग क्षेत्रात २७ वर्षांपेक्षा अधिक अनुभव असून, त्यांनी १५० हून अधिक आंतरराष्ट्रीय संशोधन लेख प्रसिद्ध केले आहेत. त्यांना ३४ पेटंट्स प्राप्त झाले असून विज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील त्यांचे योगदान अतिशय मोलाचे आहे.
डॉ. वेंकट सुब्रमण्यम यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्वांटम कम्प्युटिंगमधील सध्याच्या घडामोडी, भविष्यातील दिशा, तसेच शैक्षणिक व करिअर संधी याबाबत सविस्तर माहिती दिली. सत्रादरम्यान विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्यांनी सखोल आणि संवादात्मक उत्तरं दिली, ज्यामुळे सत्र अत्यंत ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी ठरले.
कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, विभागप्रमुख डॉ. सुभाष पिंगळे, संगणक विभागातील प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने ऑनलाईन उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या सत्राबद्दल समाधान व्यक्त करत "हे सत्र अत्यंत प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण ठरले," अशी प्रतिक्रिया दिली.
कार्यक्रमाची सांगता प्रा. सुमीत इंगोले यांच्या आभारप्रदर्शनाने झाली. या व्याख्यानाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी संगणक अभियांत्रिकी विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

