*एस. के. एन. सिंहगड कॉलेज, पंढरपूर येथे व्हीएलएसआय डिझाईनची मूलभूत तत्चे- डिझाईनची प्रारंभिक प्रक्रिया आणि डिझाईनची अंमलबजावणी प्रक्रिया या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न*
पंढरपूर (प्रतिनिधी):
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागात, दिनांक ०८ ते १० सप्टेंबर २०२५ या कालावधीत व्हीएलएसआय डिझाईनची मूलभूत तत्चे - डिझाईनची प्रारंभिक प्रक्रिया आणि डिझाईनची अंमलबजावणी प्रक्रिया या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या कार्यशाळेचे समन्वयन विभागातील प्रा. अंजली पिसे यांनी केले. विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी आणि प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
कार्यशाळेची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जे. करांडे यांच्या हस्ते प्रमुख प्रशिक्षक डॉ. कंबालिमठ यांच्या सत्काराने करण्यात आली.
कार्यशाळेचे सत्रनिहाय स्वरूप: पहिल्या दिवशी, डॉ. कंबालिमठ यांनी व्हीएलएसआय मधील डिझाईनची प्रारंभिक प्रक्रिया या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी, डिझाईनची प्रारंभिक प्रक्रिया आणि डिझाईनची अंमलबजावणी प्रक्रिया यामधील दुवा व समन्वय याची माहिती दिली गेली. तिसऱ्या दिवशी, डिझाईनची अंमलबजावणी प्रक्रिया आणि एकत्रीकरण, तसेच एएसआयसी डिझाईन प्रक्रिया , एफपीजीए अंमलबजावणी आणि इडीए साधनाचा वापर या महत्त्वाच्या तांत्रिक बाबी सविस्तरपणे समजावून सांगण्यात आल्या.
या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना "डिजिटल सर्किटची प्रारंभिक वर्तणूक व डेटा प्रवाहाचे डिझाईन तयार करण्यापासून ते त्या डिझाईनचे प्रत्यक्ष चिप स्वरूपात अंमलबजावणी करण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया" प्रत्यक्ष अनुभवातून समजावून सांगण्यात आली.
विद्यार्थ्यांनी डिझाईनची प्रारंभिक प्रक्रिया आणि डिझाईनची अंमलबजावणी प्रक्रिया यामधील तांत्रिक दरी समजून घेतली आणि विद्युत वापर कमी ठेवत, कार्यक्षमता वाढवणे आणि चिपचे क्षेत्रफळ मर्यादित ठेवणे — यामध्ये योग्य तडजोड कशी साधायची, हे आत्मसात केले.
या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना उद्योगजगतात आवश्यक तांत्रिक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळाली. तसेच सेमिकंडक्टर क्षेत्रातील इंटर्नशिप, संशोधन व करिअरच्या संधींसाठी त्यांना योग्य दिशादर्शन आणि आत्मविश्वास प्राप्त झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन अंतिम वर्षातील विद्यार्थिनी कु. वरदा बिडकर हिने उत्कृष्टरित्या पार पाडले.
या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

