पंढरपूर सिंहगडच्या विदयार्थ्यांचा आषाढी वारीनिमित्त उपक्रम*

 *पंढरपूर सिंहगडच्या विदयार्थ्यांचा आषाढी वारीनिमित्त उपक्रम*



पंढरपूर – ‘पंढरीची वारी करी वारकरी उन्ह पावसाची चिंता कोण करी’ असे म्हणत लाखो विठ्ठल भक्त वारकरी पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी पायी चालत येतात. आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा एक मोठा सणच. हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्ती. आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी येतात. अशा या वारीमध्ये वारकऱ्यांची सेवा ही एक अत्यंत पुण्याची गोष्ट मानली जाते. या आषाढी एकादशीचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर येथील राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत "पाणीवाटप उपक्रम" ०४ जुलै २०२५ ते ०५ जुलै २०२५ सकाळी १० ते सायं. ६ पर्यंत आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

या उपक्रमात महाविद्यालयातील स्वयंसेवकांनी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर थकलेल्या, दमलेल्या व तहानलेल्या वारकऱ्यांना थंड पाणी वाटप केले. उन्हाच्या तीव्रतेतही वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. या कार्यात राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला. 

हा उपक्रम म्हणजे समाजासाठी काहीतरी चांगल करण्याची विद्यार्थ्यांची जाणीव आणि " मानव सेवा हीच ईश्वरसेवा" याची प्रचिती देणारा एक सुंदर अनुभव ठरला. पंढरपूरच्या वारीत अशा सेवाभावी कार्यातून तरुणांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना रुजत आहे. 

सदरील उपक्रमामध्ये महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. के. जे. करांडे, उपप्राचार्य डॉ. एस. जी. कुलकर्णी, रासयोचे समन्वयक प्रा.चंद्रकांत एम. देशमुख, प्रा.सुमीत इंगोले, प्रा.अर्जुन मासाळ, प्रा.गुरुराज इनामदार, प्रा.अजित करांडे, प्रा. सिध्देश्वर गंगोंडा तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी यांची प्रमुख उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad