परिश्रमात सातत्य ठेवल्यास यश नक्कीच मिळेल - व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. प्रशांत पवार
‘एमएचटी-सीईटी २०२४’ साठी स्वेरीत ऑनलाईन ‘क्रॅश कोर्स’चे उदघाटन
पंढरपूर- ‘स्वेरीने आयोजित केलेल्या मोफत ऑनलाईन ‘क्रॅश कोर्स’ चा प्रत्येक तास महत्त्वाचा असून यामधून आपण आत्मविश्वासाबरोबरच शासनाच्या मुख्य सीईटी परीक्षेसाठी देखील सज्ज होणार आहोत. करीअर मध्ये जर आपल्याला यश मिळवायचे असेल तर आपण करत असलेल्या प्रयत्नात सातत्य ठेवण्याची गरज आहे. ज्यावेळी गेट परीक्षा आपण क्वॉलिफाय होतो तेंव्हा आयआयटीला प्रवेश मिळवता येतो. त्याप्रमाणे आपण सीईटी परीक्षेत चांगले गुण मिळविले तर आपल्याला पुढे हव्या त्या महाविद्यालयात आणि हव्या त्या शाखेस प्रवेश मिळवता येतो. ‘आपण ग्रामीण भागातील आहोत, आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे’ अशा अनेक गोष्टींची मनात असलेली न्यूनगंडता प्रथम बाजूला ठेवा. चांगल्या गोष्टीच्या सहवासात राहिल्यास करिअरमध्ये यशस्वी होण्याच्या अनेक संधी निर्माण होतात. वीस दिवस मोफत असलेल्या या ऑनलाईन ‘क्रॅश कोर्स’ चा एकही तास बुडवू नका. कारण कमी वेळेत जास्तीत जास्त तयारी झाली पाहिजे. ‘क्रॅश कोर्स’च्या माध्यमातून मिळालेले शिक्षण हे मुख्य सीईटीच्या परीक्षेचा ‘पाया’ असणार आहे. या वीस दिवसात तुम्हाला मिळालेले शिक्षण हे तुमच्या आयुष्याचा ‘टर्निंग पॉईंट ठरेल. एकूणच परिश्रमात सातत्य ठेवल्याने यश नक्कीच मिळते.’ असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या व्यवस्थापन परिषदेचे (मॅनेंजमेंट कौन्सिल) सदस्य व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सिव्हील इंजिनिअरिंग या विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पवार यांनी केले.
इंजिनिअरिंग प्रवेशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी महाराष्ट्र शासनाची सीईटी परीक्षा देत असताना विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या परीक्षेसंदर्भात अचूक मार्गदर्शन व्हावे या हेतूने स्वेरीतर्फे दि. ११ मार्च ते ३१ मार्च २०२४ पर्यंत आयोजिलेल्या मोफत ऑनलाईन ‘क्रॅश कोर्स’ च्या उदघाटन प्रसंगी डॉ. प्रशांत पवार हे मार्गदर्शन करत होते. यावेळी बारावी परीक्षा दिलेले विद्यार्थी, त्यांचे पालक व शिक्षक असे एकूण ४०० हून अधिकजण ऑनलाईन उपस्थित होते. या ‘क्रॅश कोर्स’ मधून
महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सीईटी परीक्षेची तयारी करण्याच्या हेतूने मार्गदर्शन व अध्यापन केले जाणार आहे. यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स या विषयांच्या तयारी करण्यासाठी तज्ञ प्राध्यापक मार्गदर्शन करणार आहेत. प्रास्ताविकात डॉ.यशपाल खेडकर म्हणाले की, ‘डॉ.बी.पी. रोंगे सरांनी स्वेरीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाचे दालन उभे केले आहे. १९९८ साली स्थापना झालेल्या स्वेरीला गेल्या वर्षी २५ वर्षे पूर्ण झाली. या रौप्य महोत्सवी वर्षात यशाचा आलेख चढता राहिला आहे. स्थापनेपासून सुरु झालेल्या प्रवासात अनेक आंतरराष्ट्रीय वाटचाली सुरु असताना ही वाटचाल ‘ऑटोनॉमस’ पर्यंत पोहचली आहे.’ असे सांगून ‘मुख्य सीईटीची परीक्षा कशी असते’ याबाबत माहिती दिली. या ‘क्रॅश कोर्स’ मध्ये फिजिक्स विषयासाठी डॉ. एस. ए. लेंडवे, केमिस्ट्री विषयासाठी डॉ. एम.एम. आवताडे तर मॅथ्स विषयासाठी डॉ. एच.एच.पवार हे अनुभवी प्राध्यापक मार्गदर्शन करणार आहेत. उदघाटनाच्या दिवशी प्रा.सुनील गायकवाड यांनी फिजिक्स विषयातील युनिट व मेजरमेंट तसेच फिजिक्स संबंधी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात प्रा. पी.टी. लोखंडे यांनी केमिस्ट्री विषयाचे महत्व पटवून सांगितले तर शेवटच्या सत्रात डॉ. एच.एच.पवार यांनी मॅथ्स विषयातील दुर्लक्षित समजल्या जाणाऱ्या पण महत्वाच्या असणाऱ्या गोष्टींकडे लक्ष वेधले. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीमध्ये सुरू झालेल्या या क्रॅश कोर्समध्ये बारावी सायन्स मधून परीक्षा दिली आहे असे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. त्यासाठी अशा विद्यार्थ्यांनी मोबा.नं.–९५९५९२११५४ व ९१६८६५५३६५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा.करण पाटील यांनी केले आहे. या क्रॅश कोर्सच्या माध्यमातून मुख्य सीईटी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे त्याच बरोबर मुख्य परीक्षेच्या दृष्टीने तयारी देखील होणार आहे त्यामुळे स्वेरीने उपलब्ध करून दिलेल्या या संधीमुळे भावी अभियंत्यामध्ये व त्यांच्या पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.