पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठाच्या प्रभारी अधिष्ठाता पदी व व्यवस्थापन परिषदेवर डॉ. प्रशांत पवार यांची निवड
दुहेरी मुकुट मिळाल्यामुळे स्वेरीत डॉ. प्रशांत पवार यांचा सत्कार
पंढरपूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या प्रभारी अधिष्ठातापदी व व्यवस्थापन परिषदेच्या (मॅनेंजमेंट कौन्सिल) सदस्यपदी गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या डॉ.प्रशांत मारुती पवार यांची नियुक्ती कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर यांनी केली. डॉ.प्रशांत पवार यांना एकाचवेळी दुहेरी मुकुट मिळाल्यामुळे स्वेरीच्या वतीने स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
सोलापूर जिल्ह्यात संशोधनाचे वारे खऱ्या अर्थाने स्वेरीत होणाऱ्या नियमितच्या संशोधन प्रकल्पांमुळे वाहू लागले. त्यानंतर जिल्ह्यातील संशोधन प्रक्रिया अधिक गतिमान झाल्या. त्यामुळे जिल्ह्यात अल्पावधीत ‘संशोधन आणि स्वेरी’ असे एक समीकरण बनले. ग्रामीण भागातील एक युवा शास्त्रज्ञ म्हणून नावारुपास आलेल्या डॉ.प्रशांत पवार यांचा शैक्षणिक प्रवास पाहिला तर संशोधनातील त्यांची झेप समजून येईल. डॉ. प्रशांत पवार यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मधून सन २००० साली सिव्हील इंजिनिअरिंगची पदवी संपादित केली. त्यानंतर गुवाहाटी मधील इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजी (आयआयटी) येथून एम.टेक.ही पदव्युत्तर पदवी मिळविल्यानंतर देशाच्या अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या इंडियन इन्सिटटयुट ऑफ सायन्स (आयआयएससी), बेंगलोर येथून ‘हेलिकॉप्टर’ या विषयावर त्यांनी पीएच.डी. पूर्ण केली. त्यांच्या पीएच.डी. करीता त्यांना गोल्ड मेडलही मिळालेले होते. पुढे कोन्कुक विद्यापीठ, सेऊल (दक्षिण कोरीया) येथून त्यांनी पोस्ट डॉक्टरेटही पूर्ण केली. स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मागील १६ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी संशोधन अधिष्ठाता, शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख अशा विविध पदांवर कार्य केले आहे. त्यांची आतापर्यंत ८ पुस्तके आणि जवळपास १२५ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल पेपर्स प्रकाशित झाले असून १ पेटंट देखील त्यांच्या नावे मंजूर आहे तसेच त्यांचे ‘स्प्रींजर’ या इंग्लड येथील आंतरराष्ट्रीय प्रकाशनातर्फे हेलिकॉप्टर या विषयावरील पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत ७ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी संपादित केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी मार्गदर्शन केलेल्या विद्यार्थ्यांचे पीएच.डी. प्रबंध देखील ‘सामाजिक प्रश्न’ हे तंत्रज्ञानामार्फत सोडविण्याच्या विषयावरच आधारित आहेत. त्यांनी कोरीया, कॅनडा, अमेरीका, फ्रान्स, चीन व दुबई मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. २०१६, २०१८,२०२० आणि २०२२ या चार वर्षी स्वेरीमध्ये ‘टेक्नोसोसायटल’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे त्यांनी यशस्वी आयोजन केले होते. या परिषदेच्या माध्यमातून देश व परदेशातील शास्त्रज्ञांना आमंत्रित करून त्यांनी संशोधनाविषयी महत्वाची भूमिका बजावली. त्यांना भारत सरकारच्या सायन्स व टेक्नोलॉजी मंत्रालयाने ‘युवा शास्त्रज्ञ’ म्हणून देखील गौरविले आहे. तसेच त्यांनी दिल्ली येथील केंद्र सरकारच्या ‘डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँण्ड टेक्नोलॉजी’च्या ‘फंड फॉर इंप्रुव्हमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजी (फिस्ट) या योजनेअंतर्गत स्वेरीसाठी ६० लाख रुपयांचा निधी मिळविला असून या निधीसह स्वेरीला त्यांनी आजपर्यंत ५० संशोधन प्रकल्पांसाठी जवळपास २२ कोटी रुपये इतका निधी मिळविण्यासाठी महत्वाची भूमिका निभावली आहे. आयआयटी बॉम्बे, व्हीजेटीआय मुंबई, व स्वेरी यांना संयुक्तपणे ३३.७३ कोटी एवढा संयुक्त संशोधन निधी ड्रोन संशोधनासाठी मिळाला आहे. एकूणच केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने ग्रामीण भागातील विकासासाठी केल्या जाणाऱ्या संशोधनात त्यांचे मोठे योगदान आहे. भारत सरकारच्या ए.आय.सी. टी. ई. कडून अलीकडेच त्यांना देशपातळीवरील 'विश्र्वेश्वरय्या बेस्ट टीचर्स अवॉर्ड' हा प्रथम क्रमांकाने मिळालेला आहे. पु. अ. हो. सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद व संशोधन मंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्यामुळे डॉ. पवार यांचे स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनिफ शेख, इतर पदाधिकारी, विश्वस्त, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, संस्थेअंतर्गत असणाऱ्या बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम.जी.मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले असून त्यांच्या निवडीमुळे सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.