‘व्हॅलेंटाईन डे’ ला फाटा देत स्वेरीने साजरा केला ‘रोटी डे’ स्वेरीच्या एम. बी. ए. विभागाने साजरा केलेल्या आगळ्या वेगळ्या ‘प्रेम दिवसा’चीच सर्वत्र चर्चा!


‘व्हॅलेंटाईन डे’ ला फाटा देत स्वेरीने साजरा केला ‘रोटी डे’


स्वेरीच्या एम. बी. ए. विभागाने साजरा केलेल्या आगळ्या वेगळ्या ‘प्रेम दिवसा’चीच सर्वत्र चर्चा!





पंढरपूर- मागील काही दिवसांपासून आपल्यातील तरुणाई ही पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करत विविध डे साजरा करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सामाजिक भान हरपलेली ही तरुणाई अंधकारमय भविष्याच्या दिशेने जात असल्याचे आपण पाहत आहोत.‘उद्याच्या भारताचे आपण आधारस्तंभ आहोत' याचा जणू या तरुणाईला विसर पडलेला असल्याचे आपल्याला जाणवते. अशा मुल्यहिन संस्कृती मधून तरुणाईला वेळीच बाहेर काढणे गरजेचे आहे. म्हणून स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व एम.बी.ए.चे विभागप्रमुख प्रा. करण पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘व्हॅलेंटाईन डे’ ला फाटा देत आपल्या समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी ‘रोटी डे’ साजरा करण्यात आला. याचे पंढरपूर पंचक्रोशीत कौतुक होत आहे. 


    

         स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे व एम.बी.ए.चे विभागप्रमुख प्रा. करण पाटील यांच्या माध्यमातून एम.बी.ए. विभागामधील विद्यार्थ्यांनी काहीतरी वेगळा असा सामाजिक उपक्रम करायचे ठरवले. अखेर ठरला तो दिवस, ठरले ते ठिकाण आणि निवडला तो ‘प्रेम’ दिवस ! अर्थात १४ फेब्रुवारी २०२४! झालं! स्वेरीच्या एम. बी. ए. चा प्रत्येक विद्यार्थी योगदानासाठी पुढे सरसावला. या अनुषंगाने स्वतःच्या घरून कोणी चपात्या तर कोणी भाकरी आणल्या. संपूर्ण दिवसभर जरी वाटप केले तरी खराब होणार नाहीत अशा चमचमीत भाज्या आणल्या. वेळ न घालवता पॅकेटमध्ये दोन तर काहीमध्ये तीन चपात्या, भाकरी व भाजी अशा स्वरूपात जवळपास ७०० पॅकेट तयार करून मोठ्या बॉक्समध्ये घेवून साधारण अकराच्या सुमारास ११० विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी संभाजी वलटे यांच्यासह एम.बी. ए. विभाग आपली मोहीम फत्ते करण्यास निघाला. प्रथम गोपाळपूरातील श्री संत तनपुरे महाराज संचलित मातोश्री वृद्धाश्रम गाठले. वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक धनंजय राक्षे यांनी सर्वांचे स्वागत केले. तेथे वृद्धाश्रमात ‘अन्नदान’ करून हा आगळावेगळा ‘रोटी डे’ साजरा केला. ‘आमची मुले, आमचे नातू तुमच्या एवढीच मोठी झाली असावीत’ असे म्हणत त्या वृद्धांच्या डोळ्यात अश्रू तरळले. विद्यार्थ्यांनी आणलेले अन्न, फळे त्यांनी घेऊन विद्यार्थ्यांना आशिर्वाद दिले. अन्नदान करताना वृद्धांसमवेत साधलेल्या संवादामुळे अनेक विद्यार्थी व विद्यार्थीनींना अक्षरश: रडू कोसळले. साधारण दोन तास हा उपक्रम केल्यानंतर निर्माण झालेल्या प्रेमामुळे विद्यार्थ्यांचे पाय काही कॉलेजकडे वळेनात, पुन्हा त्यांनी मोर्चा वळविला तो पंढरपूर शहरातील दत्त घाटानजीकच्या पायाऱ्यांकडे! तेथे असलेल्या सर्व भिक्षुकांना विद्यार्थ्यांनी अन्नाची पाकिटे दिली. सायंकाळी विद्यार्थ्यांनी विठ्ठलाचे मुखदर्शन घेऊन कॉलेजच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू केला. मनापासून व आनंदाने केलेल्या 'रोटी डे’ या उपक्रमाने सर्वांचे चेहरे प्रफुल्लीत झाले होते. स्वेरीने ‘रोटी डे’ च्या रूपाने हा अदभूत समाज प्रबोधनाचा उपक्रम साजरा केला. ‘स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी पैशाचा अपव्यय न करता वेळ आणि पैसा सत्कारणी लावला', अशी चर्चा दिवसभर पंढरपूर पंचक्रोशीत होती. स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी केलेला हा नाविन्यपूर्ण उपक्रम खूप काही सकारात्मकता शिकवून जाईल, हे मात्र नक्की!


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.