स्वेरीतील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाचा ‘किर्लोस्कर फेरस लिमिटेड’ सोबत सामंजस्य करार
पंढरपूर: ‘गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाचा सोलापूर येथील ‘किर्लोस्कर फेरस लिमिटेड’ या कंपनीसोबत नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सामंजस्य करारामुळे किर्लोस्कर या कंपनीची स्वेरीच्या विद्यार्थ्यांना करिअर घडविण्यासाठी मोलाची मदत मिळणार आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
या कराराच्या माध्यमातून स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांना ‘इंटर्नशिप, इंडस्ट्री इंप्लांट ट्रेनिंग’ इ. च्या माध्यमातून विविध प्रकारचे फायदे होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने करिअरसाठी कौशल्य विकास, भविष्यातील नवीन ट्रेंड्स बद्दल माहिती आणि प्रशिक्षण, या व्यतिरिक्त संस्थेच्या शिक्षकांना देखील कौशल्य विकासासाठी तसेच नवनवीन तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी या व्यासपीठाचा उपयोग होणार आहे. या सामंजस्य करारावर ‘किर्लोस्कर फेरसच्या वतीने प्लांट हेड संतोष घुमाष्टे व स्वेरीच्या वतीने ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रा.अविनाश मोटे यांनी तसेच संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. स्वेरीचे अशाच प्रकारे इतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय औद्योगिक संस्था, संशोधन संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या सोबत सामंजस्य करार केलेले आहेत. या करारांचा फायदा शिक्षक व विद्यार्थ्यांना होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण मिळावे या हेतूने १९९८ साली अभियांत्रिकी महाविद्यालयाची सुरवात झाली. तेथून पुढे विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देणे एवढ्यावरच न थांबता त्यांचा कल संशोधनाकडे कसा वळविला जाईल हे पाहून त्या दृष्टीने संस्थेने पाऊले उचलली आहेत. आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबरोबरच शहरी व परराज्यातील विद्यार्थी देखील स्वेरीकडे शिक्षणासाठी वळत आहेत. स्वेरीचे विद्यार्थी कॅम्पस प्लेसमेंट, विद्यापीठात सर्वोच्च निकाल मिळविण्याबरोबरच प्रशासकीय नोकऱ्या व संशोधनाकडे वळत आहेत ही सोलापूर जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्रालादेखील गौरवाची बाब आहे. हा करार पूर्ण होण्यासाठी विभागप्रमुख डॉ.एस.बी.भोसले, डॉ.पी.आर.कुलकर्णी व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागातील प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. यावेळी किर्लोस्करचे संतोष घुमाष्टे, ऋषिकेश कुलकर्णी यांच्यासह इतर प्राध्यापक उपस्थित होते. हा महत्त्वपूर्ण करार करण्यात आल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, कॅम्पस इनचार्ज डॉ. एम.एम.पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी सर्वांचे अभिनंदन केले.