अमेरिकेतील उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीची संधी
-प्रादेशिक अधिकारी डॉ. रयान परेरा
स्वेरीत ‘हायर स्टडीज इन युनायटेड स्टेट्स’ या विषयावर मार्गदर्शन सत्र संपन्न
पंढरपूर- ‘तंत्रशिक्षणात अव्वल स्थानी असलेल्या स्वेरीमध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे तंत्रशिक्षण मिळत आहे. ही बाब अभिमानास्पद आहे. याचप्रमाणे अमेरिकेत देखील भारतीय विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्रपणे उच्च शिक्षण घेण्यासाठी सोय असून सदर शिक्षणासाठी अमेरिकन सरकारने शिष्यवृत्तीची सोय देखील केली आहे. भारतातील विद्यार्थ्यांनी अमेरिकेमध्ये मिळणाऱ्या शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता तपासून अमेरिकेतील उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करावेत कारण त्यासाठी विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीची संधी उपलब्ध आहेत.’ असे प्रतिपादन युनायटेड स्टेट्स-इंडिया एज्युकेशनल फाउंडेशनचे प्रादेशिक अधिकारी डॉ. रयान परेरा यांनी केले.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांना ‘हायर स्टडीज इन युनायटेड स्टेट्स’ या विषयावर आयोजिलेल्या मार्गदर्शन सत्रात डॉ. रयान परेरा बहुमोल मार्गदर्शन करत होते. स्वेरी गीतानंतर स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी डॉ.परेरा यांचे स्वागत करून प्रास्ताविकात ‘उच्च शिक्षण घेतल्यानंतर स्वतःमध्ये निर्णय घेण्याची क्षमता, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास आदी महत्वाचे गुण वाढीस लागतात.’ असे सांगून 'जर अंगी प्रचंड आत्मविश्वास असेल आणि त्याला कठोर परिश्रमाची जोड दिली तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळते. आज आपले जग जवळ आले असून प्रत्येकाला परदेशात जाऊन शिक्षण व नोकरी करता येणे शक्य आहे. त्यासाठी फक्त न्यूनगंड हा मानसिक अडथळा दूर करता आला पाहिजे.' असे डॉ. रोंगे यांनी आवर्जून नमूद केले. पुढे बोलताना डॉ. परेरा म्हणाले की, ‘अमेरिकमध्ये भारतीयांसाठी विशेष उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यासाठी विविध शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत. भारतातील अनेक विद्यार्थी अमेरिकेत शिष्यवृत्तीच्या आधारे उच्च शिक्षण घेत आहेत. अमेरिकेतील विविध विद्यापीठात प्रत्येक वर्षी जवळपास अडीच लाख विद्यार्थी उच्चशिक्षण घेत असतात. अमेरिकेत उच्च शिक्षण घेतल्यानंतर एक वर्ष विद्यार्थी शिष्यवृत्तीसह प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरी करू शकतो. त्यानंतर पुढे दोन वर्षापर्यंत अमेरिकेतच प्राथमिक स्वरूपात नोकरी दिली जाते. त्यानंतर त्या विद्यार्थ्याला अमेरिकेत अथवा इतरत्र नोकरी मिळू शकते. अमेरिकेत उच्च शिक्षण घेतल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या पगाराची नोकरी मिळण्यास मदत होत असते. त्यामुळे अनेक विद्यार्थी पदवीनंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेकडे वळतात. अमेरिकेतील कोणकोणत्या विद्यापीठात कोणकोणते पदवी अभ्यासक्रम व यासाठी लागणारा खर्च, कालावधी याची माहिती वेबसाइटवर उपलब्ध असल्याचेही डॉ. रयान यांनी स्पष्ट केले. तसेच ही सर्व माहिती मोफत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी अमेरिकेतील उच्च शिक्षणाबाबत स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी कुतुहलाने अनेक प्रश्न विचारले असता डॉ. रयान यांनी समाधानकारक उत्तरे दिली. यावेळी 'स्टडी ऑफ सोलार डिप्लॉयमेंट इन पंढरपूर’ या विषयावर स्वेरीत संशोधन करण्यासाठी ‘नेहरू पुलब्राईट यु.एस. स्टुडंट रिसर्च प्रोग्राम’ च्या माध्यमातून आलेले वर्जीनिया (वॉशिंग्टन, अमेरिका) मधील झॅकरी मरहंका, आप्पासाहेब गाजरे, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.महेश मठपती, पब्लिसिटी प्रोटोकॉलचे अधिष्ठाता डॉ.डी. एस.चौधरी यांच्यासह प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमाचे विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन केले तर विद्यार्थिनी सचिवा राजनंदिनी पाटील यांनी आभार मानले.