स्वेरीच्या प्राध्यापकांची ‘लक्ष्मी हायड्रोलिक्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीला भेट


स्वेरीच्या प्राध्यापकांची ‘लक्ष्मी हायड्रोलिक्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीला भेट




पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापकांनी सोलापूर मधील ‘लक्ष्मी हायड्रोलीक्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीला नुकतीच भेट दिली. कंपनीमध्ये निर्माण केल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिकल मोटर व पंप यांचा अभ्यास करणे हा या भेटीमागचा उद्देश होता.           

         स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.दीप्ती तंबोळी यांच्या नेतृत्वाखाली या कंपनीच्या भेटीचे आयोजन केले होते. प्रारंभी तेथील अधिकाऱ्यांनी स्वेरीच्या प्राध्यापकांचे स्वागत केले. त्यानंतर कंपनीमध्ये असलेल्या विविध कामकाजाची माहिती देण्यात आली. यामध्ये बेअरिंग, गिअर बॉक्स, फ्रेम, ट्रांसफार्मिंग, असेंबली सेटिंग, वायंडिंग सेक्शन आदी विभागांमध्ये भेट देवून कामाची माहिती घेण्यात आली. यावेळी कंपनीचे इलेक्ट्रिकल संशोधन विभागाचे प्रमुख सतीश गुंजे, मेकॅनिकल विभागाचे प्रमुख गोविंदराज मादगुंडी, तसेच पी. व्ही. पवार, अजित कांबळे, मोहन चटके, चंद्रकांत जंगम या कंपनीमधील तज्ञ अधिकाऱ्यांनी स्वेरीच्या शिक्षकांना अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली. सोलापुरातील ‘लक्ष्मी हायड्रॉलिक्स’ ही इलेक्ट्रिकल इंडक्शन मोटर मॅन्युफॅक्चरिंग या क्षेत्रातील कंपनी आहे. या कंपनीमध्ये दर महिन्याला २० हजार पेक्षा जास्त मोटर व २५०० पेक्षा जास्त गिअर बॉक्स तयार करण्याची क्षमता आहे. या कंपनीच्या उत्पादनांना आयएसआय ट्रेडमार्क आहे म्हणजेच ही उत्पादने अत्यंत उच्च दर्जाची असतात. ही कंपनी विश्वभरातील ग्राहकांसाठी उच्चतम गुणवत्तेचे इलेक्ट्रिक मोटर निर्मिती करते आणि ही कंपनी सर्वदूर पोहोचली आहे. ग्राहकांच्या गरजेनुसार त्यांना पुरवठा करून उद्योगात अग्रेसर राहण्यासाठी ही कंपनी सदैव प्रयत्नशील असते. अल्पावधीतच या कंपनीने मोठी भरारी घेतली आहे. स्वेरीतर्फे प्लेसमेंट विभागाचे प्रा. अविनाश मोटे म्हणाले की, ‘लक्ष्मी हायड्रोलिक्स ही कंपनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सातत्याने नवनवीन शिक्षण व माहिती देण्यासाठी तत्पर असते. या कंपनीच्या माध्यमातून दिलेल्या माहितीमुळे प्राध्यापकांना अधिक ज्ञान मिळेल व पुढे तेच प्राध्यापक आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. ही कंपनी विद्यार्थ्यांना भविष्यातील उद्योजक निर्माण करण्यासाठी नेहमी प्रेरणा देत असते. म्हणून या कंपनीचा अभिमान वाटतो.’ यावेळी लक्ष्मी हायड्रोलिक्स कंपनीचे संस्थापक चेअरमन शरदचंद्र ठाकरे, तांत्रिक संचालक आदित्य ठाकरे तसेच कंपनीचे अध्यक्ष निरंजन शिंगवी, आदी कंपनीतील अधिकारी उपस्थित होते. मानव संसाधन विभागाचे प्रमुख भरतकुमार वेदपाठक यांनी कंपनी बद्धल सर्व माहिती देत त्यांनी कंपनीच्या वर्क कल्चर आणि संबंधित बाबीबद्दल सविस्तर सादरीकरण केले व कंपनीतील इतर अधिकाऱ्यांनी कंपनीकडून निर्मिती होणाऱ्या सर्व साहित्यांची माहिती दिली. त्यावेळी स्वेरीच्या इलेक्ट्रिकल विभागाचे डॉ.मोहन ठाकरे व सर्व प्राध्यापक तसेच संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ.अमरजित केने आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad