आयओटी’ आणि ‘एआय’च्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास शक्य - आयआयटी मुंबईचे डॉ.जे.आदिनारायण
स्वेरीत ड्रोन तंत्रज्ञानावरील दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न
पंढरपूर- ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी)’ आणि ‘आर्टीफीशीअल इंटीलीजन्स (एआय)’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा शेतीच्या प्रगतीसाठी करता येणार असून त्यामुळे ग्रामीण भागाच्या जलद विकासासाठी मदत होणार आहे. भविष्यात या तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील शेतीला तंत्रज्ञानाची साथ व योग्य मार्गदर्शन मिळाले तर पारंपारिक शेतीचे रूपांतर अत्याधुनिक शेती मध्ये करणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे पारंपारिक शेती व्यवसायाचे महत्व वाढणार आहे. या तंत्रज्ञानामुळे शेती अत्याधुनिक पद्धतीने करण्यासाठी मोलाची मदत मिळणार आहे.’ असे प्रतिपादन आयआयटी, मुंबईचे प्रा.डॉ.जे. आदिनारायण यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय व आयआयटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आयआयटी, मुंबई मधील सेंटर ऑफ स्टडीज् इन रिसोर्स एनर्जी विभागाचे प्रमुख डॉ.जे. आदिनारायण आणि एरोस्पेस एनर्जीचे डॉ.ध्वनील शुक्ला हे या ‘ड्रोन’ वर आधारित कार्यशाळेमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. स्वेरीचे संस्थापक सचिव आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे व शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाने शुक्रवार, दि.८ आणि शनिवार, दि.९ सप्टेंबर, २०२३ या दोन दिवशी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी प्रा. डॉ.जे. आदिनारायण हे मार्गदर्शन करत होते. दीप प्रज्वलनानंतर स्वेरी अभियांत्रिकीचे शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांनी आयआयटी, मुंबई मधून आलेल्या पाहुण्यांची ओळख करून ड्रोन प्रोजेक्ट संदर्भात प्राथमिक माहिती दिली. संशोधक विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये शिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य करणाऱ्या विविध सरकारी योजनांचीही त्यांनी सविस्तर माहिती दिली. डॉ. हर्षवर्धन रोंगे यांनी अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर (एसीआयसी) आणि स्वेरी अंतर्गत सुरु असलेल्या सोबस सेंटर मधील विविध संशोधन प्रकल्पांची माहिती दिली तसेच महिला बचतगटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करण्याबाबत मार्गदर्शन केले. डॉ.ध्वनील शुक्ला यांनी विद्यार्थी व संशोधक प्राध्यापकांना अवकाशात ‘ड्रोनचे कामकाज नेमके कसे चालते?' हे प्रात्यक्षिकाद्वारे सांगितले. यावेळी त्यांनी कागदाचा वापर करून 'हेलिकॉप्टर' बनविले आणि त्याद्वारे प्रात्यक्षिक दाखवले. यानंतर ड्रोनची पार्श्वभुमी, इतिहास, ड्रोनचे विविध प्रकार, ड्रोनचे भाग, विंग ड्रोन एरोडायनॅमिक्स रोटर शेन, एरोडायनॅमिक इत्यादी बाबत मार्गदर्शन केले. पुढे त्यांनी स्थानिक ऊर्जा स्त्रोत, हायड्रोजन इंधन, सेल पेट्रोल, डिझेल, बायोगॅस फ्लेक्स इंधनाचा वापर करणे, झोनमध्ये टायपरस्पेक्ट्रल आणि मल्टीस्पेक्ट्रल बाबींचा उपयोग करणे, याबाबत बहुमोल माहिती दिली. यावेळी ड्रोन टिंकरिंग प्रयोगशाळेचे पाहुण्यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. दुसऱ्या दिवशी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या उपस्थितीत संशोधनासंबंधी एक महत्वाची बैठक बोलावण्यात आली होती. यामध्ये डॉ.जे.आदिनारायण व डॉ.ध्वनील शुक्ला यांनी विद्यार्थ्यांना संशोधनासंबंधी मोलाचे मार्गदर्शन केले. यामध्ये ड्रोन उत्पादनाला चालना देणे, उपलब्ध नैसर्गिक साधन सामग्रीचा वापर करून शेती करणे, ग्रामीण भागात ड्रोन विषयी जनजागृती करणे, रात्री विद्युत प्रवाह नसतो अशावेळी विजेची बचत करून नैसर्गिक बायोगॅसचा वापर करणे, बायोगॅस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना चालना देणे, ड्रोनसाठी हायड्रोजन इंधनाचा वापर करणे यासारख्या अनेक नवीन बाबी ज्या शक्य असून त्यांच्यामुळे वेळ, मनुष्यबळ व पैशाची बचत होणार आहे अशा सर्व बाबींचा खुलासा केला. यावेळी संशोधन अधिष्ठाता डॉ.अमरजीत केने, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.दीप्ती तंबोळी, डॉ. एम.पी. ठाकरे, प्रा. आर.पी. जाधव, यांच्यासह ड्रोन प्रकल्पामधील सहाय्यक सहकारी भाग्यश्री देशमुख, प्राजक्ता सुर्यवंशी, सागर कदम, केतन राजगुरू यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. दोन दिवसात पाहुण्यांनी स्वेरी कॅम्पस मधील विविध विभागांना भेटी देवून सविस्तर माहितीही जाणून घेतली.