बातमी दि. ०३/०६/२०२३
स्वेरीचा प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्ष विद्यार्थी व पालकांना ठरणार उपयुक्त
-अभिनेते मकरंद अनासपुरे
स्वेरीत 'अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्षाचे’ थाटात उदघाटन
पंढरपूर- ‘डॉ. रोंगे सरांच्या वाढदिवसाचे औचीत्य साधून या ठिकाणी आलो असता येथील शैक्षणिक माहिती जाणून घेतली. तेव्हा असं लक्षात आलं की आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी हुशार असतात परंतु योग्य मार्गदर्शनाअभावी त्यांना योग्य दिशा मिळेलच हे सांगता येत नाही. यासाठी विशेष करून ग्रामीण भागातील पालकांची व विद्यार्थ्यांची पुढील प्रवेशासाठी कोणतीही द्विधा स्थिती होऊ नये आणि पालक व विद्यार्थ्यांना प्रवेशासंदर्भात योग्य दिशा आणि अचूक माहिती मिळावी यासाठी आपण उघडलेल्या मार्गदर्शन कक्षाची मुलांना खरी गरज आहे. स्वेरीचा हा मार्गदर्शन कक्ष विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व पालकांना निश्चितच उपयुक्त ठरेल. ’ असे प्रतिपादन 'नाम' फाउंडेशनचे अध्यक्ष व चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करीता प्रथम वर्ष अभियांत्रिकी, थेट द्वितीय वर्ष (पदवी), पदव्युत्तर पदवी अभियांत्रिकी, एमबीए व एमसीए या कोर्सेसच्या प्रवेशासंदर्भातील सर्व माहिती एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या नियोजनात्मक मार्गदर्शनाखाली प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्षाची स्थापना करण्यात आली. या कक्षाच्या उदघाटन प्रसंगी 'नाम' फाउंडेशनचे अध्यक्ष व चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे मार्गदर्शन करत होते. प्रारंभी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा.करण पाटील यांनी स्वेरीतील शैक्षणिक उपक्रम, मिळालेली मानांकने, वार्षिक परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळणाऱ्या सोयी, आदीबाबत माहिती दिली. एकूणच बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेला हा मार्गदर्शन कक्ष विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना नक्कीच फायदेशीर ठरेल. याबाबत प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता प्रा. करण पाटील हे माहिती देताना म्हणाले की, ‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. बी.पी. रोंगे सरांनी १९९८ साली अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली. विद्यार्थ्यांची चांगल्या कंपनीत अथवा प्रशासकीय क्षेत्रात कशी निवड होईल व उत्तम करिअर कसं घडेल या दृष्टीने सातत्याने प्रयत्न होत असताना प्रत्येक वर्षी स्वेरीच्या यशाचा आलेख वाढत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी व त्यांच्या पालकांना अभियांत्रिकी, फार्मसी, एमबीए व एमसीए या विद्याशाखांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी तसेच शैक्षणिक शुल्क, शासनाच्या विविध स्कॉलरशिप्स, विद्यार्थ्यांसाठी असणारी वसतिगृह सुविधा, कमवा व शिका योजना आदींबाबत चर्चा व मार्गदर्शन होण्यासाठी या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या मार्गदर्शन केंद्रात उच्चशिक्षित प्राध्यापक वर्गाची टीम सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सज्ज असणार आहे. यामुळे एकाच छताखाली सर्व अचूक माहिती मिळणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची आवड/ क्षमता, पालकांची निवड आणि प्राध्यापकांशी असणारा समन्वय/संपर्क या बाबी या प्रक्रियेत अत्यंत महत्वाच्या आहेत. स्वेरी संचलित अभियांत्रिकी (पदवी) महाविद्यालयात प्रथम वर्ष, थेट द्वितीय वर्ष व पदव्युत्तर अभियांत्रिकी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापासून ते प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्रे पडताळणी, शैक्षणिक पात्रता, प्रवेश घेताना तसेच महाविद्यालयांची निवड करताना विद्यार्थ्यांनी करिअरचा विचार करून नेमक्या कोण-कोणत्या महत्वाच्या बाबी पहाव्यात व तपासाव्यात, कॅप राउंडस्, कॅम्पस प्लेसमेंट, ब्रँचची निवड, मागील वर्षातील विविध विभागांचे कट ऑफ मार्क्स या व इतर संबंधित गोष्टींबाबत विद्यार्थी व पालक यांना योग्य व खात्रीशीर मार्गदर्शन मिळणार आहे.’ अधिक माहितीसाठी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा.करण पाटील (९५९५९२११५४) व ८९२९१००६१४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. या कक्षाच्या उदघाटन प्रसंगी शिक्षणतज्ञ, तंत्रशिक्षण संचालनालयाचे व एमपीएससीचे माजी सदस्य डॉ.एन.बी. पासलकर, वेणुनगर, गुरसाळे येथील श्री.विठ्ठल सह. साखर कारखाना लिमिटेडचे चेअरमन अभिजीत (आबा) पाटील, वालचंद कॉलेज सांगलीचे डॉ.संजय धायगुडे, एस. बी. पाटील ज्युनियर कॉलेज, अनगरचे डॉ.प्रशांत कुलकर्णी, प्रा.सोमनाथ ढोले, स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त एन.एस. कागदे, विजय शेलार, धनंजय सालविठ्ठल, प्रा.सी.बी. नाडगौडा, विश्वस्त एच.एम.बागल, विश्वस्त बी.डी.रोंगे, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.