जमेल त्या क्षेत्रात एक एक पाऊल पुढे टाकत राहणे आवश्यक
- सिनेअभिनेते अमोल पालेकर
स्वेरीत ‘साने गुरुजी १२५ अभियाना' चा शुभारंभ संपन्न
पंढरपूर- ‘अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर आमरण उपोषण केले. जात, पात, वर्ण, लिंग व धर्म यापैकी कोणताही भेदभाव नसावा ही त्यांची तळमळ होती. त्यावेळी त्यांनी कोणत्याही राजकीय पाठिंब्याला नम्रपणे नाकारून उपोषण केले होते. आज आपल्या देशात इतर धर्मियांना मंदिर प्रवेश नाकारणे असे प्रकार सुरू आहेत. अमुक कपडे घालू नयेत, तमुक कपडे घालू नयेत असे अनेक नियम लादले जात आहेत. इतर धर्मीय जर प्रेमाने आपल्या मंदिराकडे आले तर त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडले जाते. असे असेल तर साने गुरुजींच्या आंदोलनास काय अर्थ उरतो? अलीकडे गाजत असलेल्या एका नृत्यांगनेस पाटील हे नाव बदलण्याची मागणी करणे हा प्रकार जाती व्यवस्था बळकट असल्याचे बोलके उदाहरण आहे. लैंगिक हिंसेला पटकन धार्मिक रंग दिला जातो आणि या विरुद्ध कुणी बोलतही नाही, याचा विचार तरुण पिढीने केला पाहिजे. तरुण पिढीने अशा वेळी काठावर बसून चालणार नाही. तरुण पिढी सरकार आणि व्यवस्थेला प्रश्न विचारणार नसेल तर भविष्य कठीण आहे. सध्याची पिढी ‘मी काय करणार’ या भूमिकेत जबाबदारी टाळत आहे. यासाठी तुम्ही जमेल त्या क्षेत्रात प्रगतीच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकणे आवश्यक आहे.’ असे प्रतिपादन सुप्रसिद्ध सिनेअभिनेते अमोल पालेकर यांनी केले.
गोपाळपूर येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये साने गुरुजी यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त व स्वेरी अभियांत्रिकी च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजिलेल्या ‘साने गुरुजी १२५ अभियाना’ च्या शुभारंभ प्रसंगी सिनेअभिनेते अमोल पालेकर हे आपले विचार व्यक्त करत होते. साने गुरुजींच्या प्रतिमा पूजनानंतर कार्यक्रमाला सुरवात झाली. राष्ट्रसेवा दलाचे माजी अध्यक्ष सुभाष वारे म्हणाले की, ‘साने गुरुजी १२५ अभियान' पुढे घेऊन जाताना व 'खरा तो एकची धर्म' अशी प्रार्थना करीत असताना एका बाजूला डॉ. बाबासाहेबांची जयंती साजरी केली म्हणून युवकाची हत्या केली जाते तर मुंबईत सहचारिणीची क्रूरपणे हत्या केली जाते. कृत्रिम बुद्धिमत्ता, द्वेष भावना याची आव्हाने आपल्या समोर आज उभा राहत आहेत. आज केवळ समाधान आणि शांतता नसल्यामुळे अनेकांचे आयुष्य अंध:कारमय झाले आहे. त्यामुळे समाजाचा खऱ्या अर्थाने विकास आणि समृद्धी साधायची असेल तर साने गुरूजींच्या विचारांची अत्यंत गरज आहे.’ साने गुरुजी स्मारकाचे अध्यक्ष संजय मं. गोपाळ म्हणाले की, ‘साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने साने गुरूजींच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित या अभियानात देशभरातील १२५ संस्था, संघटनांनी सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आज ३८ संघटना आणि संस्थांनी या अभियानात सहभाग नोंदवला असून वर्षभरातील कार्यक्रमांचे सध्या नियोजन सुरु आहे.’ उपस्थितांपैकी पाच साधकांना यावेळी पुस्तकसंच भेट स्वरुपात देण्यात आले. साने गुरुजींच्या कथा प्रत्यक्ष ऐकलेले विलासभाई शहा, तसेच जयश्री सामंत, अभियान समन्वयक अॅड विजय दिवाने, स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, राजा अवसक, अजय भोसले, मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव, जेष्ठ पत्रकार शिवाजी शिंदे, दिगंबर भगरे, नवनाथ पोरे, माऊली डांगे, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त नामदेव कागदे, विश्वस्त एच.एम. बागल, संस्थेचे माजी अध्यक्ष धनंजय सालविठ्ठल तसेच संस्थेचे माजी अध्यक्ष सी.बी.नाडगौडा यांच्यासह विविध भागातून आलेले साने गुरुजी स्मारकाचे जवळपास ५०० साधक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय मं. गोपाळ यांनी केले तर माधुरी पाटील यांनी आभार मानले.