शैक्षणिक व औद्योगिक यशासाठी संशोधन पद्धतीवर व्याख्यान उत्साहात संपन्न
पंढरपूर, दि. १ सप्टेंबर २०२६ : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग आणि इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशन (IETE) यांच्या संयुक्त विद्यमाने “शैक्षणिक व औद्योगिक यशासाठी संशोधन पद्धती” या विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या व्याख्यानासाठी डॉ. डी. जी. गानगे, सहयोगी प्राध्यापक (इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन) हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना संशोधनाची संकल्पना, संशोधन पद्धती, योग्य संशोधन नियोजन तसेच शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील संशोधनाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
संशोधन करताना विषयाची निवड, साहित्याचा आढावा, माहितीचे संकलन, माहितीचे विश्लेषण, योग्य संशोधन पद्धतीचा वापर आणि संशोधनाचे निष्कर्ष प्रभावीपणे मांडणे याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती दिली. तसेच संशोधनामध्ये योग्य नियोजन, शास्त्रीय दृष्टिकोन आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.
व्याख्यानादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध प्रश्न विचारले. या व्याख्यानाचा लाभ ६६ हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला. विद्यार्थ्यांना संशोधन प्रक्रियेची सुसंगत माहिती मिळाल्याने त्यांच्या संशोधनविषयक दृष्टिकोनाला चालना मिळाली.
या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण संशोधनासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यास तसेच भविष्यातील शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील संशोधनाच्या संधी समजून घेण्यास मदत झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी आणि विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विभागातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

