*पंढरपूर सिंहगड मध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा*
कोर्टी ता. पंढरपूर येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी कवी कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमासाठी मंगळवेढा येथील कवी व लेखक श्री इंद्रजित घुले व पंढरपूर येथील प्रा. मेधा दाते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली..
कार्यक्रमाची सुरवात कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला वंदन करून झाली. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी महाविद्यालयाच्या वतीने कवी व लेखक श्री इंद्रजित घुले तसेच प्रा. मेधा दाते यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना महाविद्यालयाचे प्रकाशन अधिष्ठाता डॉ. संपत देशमुख यांनी केली.
यावेळी कवी व लेखक श्री इंद्रजित घुले यांनी लिहिलेल्या कविता विद्यार्थ्यांसमोर सादर केल्या व साहित्य हे एका व्यक्ती किंवा विषयापुरते मर्यादित नसून साहित्याची व्याप्ती अथांग आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. मराठी भाषेचा ऐतिहासिक आढावा घेताना त्यांनी वारकरी सांप्रदायापासून ते आताच्या काळामध्ये लिहिल्या गेलेल्या वाङ्मयामध्ये असणारी मराठी भाषेची वैशिष्ट्ये स्पष्ट केली. कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या प्रा. मेधा दाते यांनी सावरकर व त्यांचे लेखन यावर प्रकाशझोत टाकत विद्यार्थ्यांनी सावरकरांचे वाङ्मय आवर्जून वाचावे असे आवाहन केले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी कुलकर्णी व प्रा. बापुसो सवासे यांनी केले व शेवटी आभार प्रदर्शन डॉ. दिपक गानमोटे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयामधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अद्विक क्लबचे विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

