*सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर येथे ‘डेटा प्रीप्रोसेसिंग फॉर एआय’ विषयावर अतिथी व्याख्यान संपन्न*
पंढरपूर :
शुक्रवार, दि. ३० जानेवारी २०२६ रोजी एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी (पंढरपूर) येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभाग व आयईटीई विद्यार्थी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने “डेटा प्रीप्रोसेसिंग फॉर एआय” या विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानाला द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा उर्त्स्फूत प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमासाठी संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभाग, एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी (पंढरपूर) येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. विनायक जगताप हे प्रमुख अतिथी वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीसाठी डेटाचे महत्त्व, डेटा स्वच्छता, अपूर्ण माहिती हाताळणी, डेटा रूपांतरण, सामान्यीकरण तसेच डेटा दृश्यीकरण याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून डेटा प्रीप्रोसेसिंगची प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली.
विद्यार्थ्यांना औद्योगिक व संशोधन क्षेत्रात डेटाचा प्रत्यक्ष वापर तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग आधारित प्रणाली विकसित करताना डेटा पूर्वप्रक्रियेची भूमिका याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. जगताप यांनी सविस्तर उत्तरे देत त्यांचे शंका निरसन केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागातील सर्व प्राध्यापकांच्या सहकार्याने करण्यात आले. यामध्ये प्रा. वैभव गोडसे व प्रा. माधवराव नाईकनवरे यांनी विशेष समन्वयाची भूमिका बजावली. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश जे. करांडे व विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.

