जीआरपी लिमिटेड , सोलापूर आयोजित प्रॉडक्ट डेव्हलपमेंट हॅकाथॉनमध्ये
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूरच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश
पंढरपूर : प्रतिनिधी
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांनी जीआरपी लिमिटेड, सोलापूर तर्फे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील प्रॉडक्ट डेव्हलपमेंट हॅकाथॉनमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल विद्यार्थ्यांना रु. ५०,०००/- (रुपये पन्नास हजार) रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.
या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्ण विचार, शाश्वत अभियांत्रिकी उपाय आणि उत्पादन विकास कौशल्ये विकसित करणे हा होता. या हॅकाथॉनमध्ये विद्यार्थ्यांना पॉलिमर कॉम्पोझिट साहित्याचा वापर करून पर्यावरणपूरक व औद्योगिकदृष्ट्या उपयुक्त उत्पादने विकसित करण्याचे आव्हान देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी दिलेल्या समस्या विधानावर सखोल अभ्यास करून व्यवहार्य उपाय सुचवले तसेच प्रभावी तांत्रिक व व्यावसायिक सादरीकरण केले.
या विजयी संघामध्ये शुभम जोशी, राहुल माळी, विश्वजीत शिंदे, हर्षद शिंदे, सुशांक सुरेश राऊत, सौरभ संजय दिघे, रिया मंदर अंत्रोळीकर, वैष्णवी राहुल जगताप, गीतांजली विक्रांत सोनावणे आणि गायत्री बापुराव फुले या दहा विद्यार्थ्यांचा समावेश होता. संघाने फर्निचर तसेच रस्ते पायाभूत सुविधांसाठी कॉम्पोझिट फायबर उत्पादने सुचवली असून त्यामध्ये शाश्वतता, टिकाऊपणा, खर्च कार्यक्षमता आणि औद्योगिक उपयोगिता यांवर भर देण्यात आला.
या यशामागे महाविद्यालयाचे प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी डॉ. समीर दत्तात्रय कटेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रेरणा व तांत्रिक मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळाली.
या उल्लेखनीय यशाबद्दल यांत्रिकी अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. श्याम श्रीधरराव कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे आणि उपप्राचार्य डॉ. स्वानंद गजानन कुलकर्णी यांनी विद्यार्थी संघाचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
हा उपक्रम एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील उद्योग-संलग्न शिक्षण, नवोन्मेष, संशोधन आणि शाश्वत अभियांत्रिकी शिक्षणाचे उत्तम उदाहरण ठरला आहे.

