पंढरपूरात शासकीय मका खरेदी सुरू; हमीभावाने शेतकऱ्यांना दिलासा...

 पंढरपूरात शासकीय मका खरेदी सुरू; हमीभावाने शेतकऱ्यांना दिलासा



पंढरपूर | प्रतिनिधी


सध्या खुल्या बाजारात मका दर १८०० ते १९०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान असताना महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला २४०० रुपये प्रति क्विंटल हमीभाव मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरत आहे. माढा मतदारसंघाचे आमदार अभिजीत आबा पाटील यांनी मका खरेदीसाठी आवश्यक असलेला गोदामाचा प्रश्न वरिष्ठ पातळीवरून मार्गी लावल्यामुळे पंढरपूर येथे शासकीय हमीभाव मका खरेदी केंद्राचा प्रत्यक्ष खरेदी शुभारंभ करण्यात आला.


दिनांक ०७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी पंढरपूर बाजार समिती आवारातील हमाल भवन समोरील खरेदी-विक्री संघाच्या गोदामात महाराष्ट्र शासनाच्या भरड धान्य हमीभाव खरेदी केंद्राचा शुभारंभ उत्साहात पार पडला.


या प्रसंगी पंढरपूर तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शांतिनाथ (संतनाथ) दादा बागल, बाजार समितीचे सभापती हरीश दादा गायकवाड, उपसभापती राजबाबू गावडे, खरेदी-विक्री संघाचे ज्येष्ठ संचालक तुकाराम कचकल आप्पा, अण्णा मामा शिंदे, रामकृष्ण जवळेकर, नारायण गायकवाड, संचालिका स्मिता भोसले, बाजार समिती संचालक आबा शिंदे तसेच खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक मोहन झेंडे उपस्थित होते. शेतकरी बांधव, हमाल व मापारी बांधवांच्या उपस्थितीत दुपारी एक वाजता खरेदी शुभारंभ करण्यात आला.


आजच्या दिवसाकरिता खरेदीसाठी एकूण नऊ शेतकऱ्यांची २०६ क्विंटल मका खरेदीसाठी बोलावण्यात आली असून, सर्व मकेची वजन-मापे आजच पूर्ण करण्यात येणार आहेत. संबंधित शेतकरी बांधवांना संध्याकाळपर्यंत पावत्या देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.


बाजारात कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. मात्र हमीभावाने मका खरेदी सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सुमारे ५०० ते ६०० रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळणार आहे. त्यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून शासनाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.


या खरेदी केंद्रामुळे पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा मका थेट शासनाकडे विक्रीस जाणार असल्याने दलालांचा फेरा टळणार असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मोठी मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad