स्वेरीत आत्मनिर्भर कृषीप्रधान भारत निर्मितीसाठी दोन दिवसीय तंत्रज्ञान कार्यशाळा संपन्न


स्वेरीत आत्मनिर्भर कृषीप्रधान भारत निर्मितीसाठी दोन दिवसीय तंत्रज्ञान कार्यशाळा संपन्न 




पंढरपूर- 'आत्मनिर्भर आणि बलशाली कृषीप्रधान भारताच्या निर्मितीसाठी तसेच शेतकऱ्यांना खते व औषधे निर्मितीत स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने 'आत्मनिर्भर शेतकरी अभियान' या उपक्रमांतर्गत गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये दि. २ व ३ नोव्हेंबर २०२५ रोजी दोन दिवसीय, विज्ञान संत अंकुश पाटील तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. या निमित्ताने अनुभव कथन मेळावा आणि राज्यस्तरीय ‘पोशिंदा’ पुरस्कार सोहळा ही पार पडला. 

    या कार्यशाळेचे आयोजन विज्ञान संत अंकुश पाटील कृषी तंत्रज्ञान समिती महाराष्ट्र, जय जवान-जय किसान, वेंकटेश्वरा को-ऑप पॉवर अँड अ‍ॅग्रो प्रोसेसिंग सह. संस्था, नाशिक, मका आधारित इथेनॉल निर्मिती प्रकल्प, इंदापूर, स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर आणि पोलिस किसान, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक (ग्रामीण) अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजिलेल्या या उपक्रमात कार्यक्रमाचे उदघाटक स्वेरीचे युवा सचिव डॉ. सुरज रोंगे, प्रमुख अतिथी वेंकटेश्वरा को-ऑप पॉवर अँड अ‍ॅग्रो प्रोसेसिंग सह. संस्था, नाशिकचे चेअरमन डॉ. शिवाजीराव डोळे, कार्यशाळा प्रशिक्षक विज्ञान संत अंकुश पाटील, सेवानिवृत्त डी.वाय.एस.पी. व पोलिस किसान सह. संस्था, पंढरपूरचे संस्थापक नानासाहेब कदम, पोलिस किसान, पंढरपूरचे चेअरमन राजेंद्र पाटील, श्रीपाद डांगे, स्वेरीचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ विश्वस्त धनंजय सालविठ्ठल आदी उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाचे उदघाटन झाले. प्रास्ताविकात सेवानिवृत्त डी.वाय.एस.पी. व संस्थापक, पोलिस किसान सह. संस्था, पंढरपूरचे संस्थापक नानासाहेब कदम यांनी सांगितले की, 'रासायनिक खते,औषधे मुक्त- स्वयंपुर्ण आत्मनिर्भर शेतकरी बनविण्यासाठी पोलिस किसान, पंढरपूरच्या वतीने आजपर्यंत ४४ प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या असून, त्याद्वारे २५ हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. ' पुढे ते म्हणाले की या तंत्रज्ञानाचा परिणाम केवळ शैक्षणिक प्रसारापुरताच मर्यादित नाही; प्रत्यक्षात आज एक लाख एकरपेक्षा अधिक जमिनीत हे तंत्रज्ञान उपयोगात आणले गेले आहे. त्यांनी उदाहरण देत सांगितले की 'काही भागात शेतकऱ्यांनी घरगुती पद्धतीने तयार केलेली खत-औषधे वापरून उत्पादनात अपेक्षित वाढ आणि शेती खर्चात झालेली लक्षणीय कपात अनेकांनी अनुभवली आहे.' कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून मनोगत व्यक्त करताना स्वेरी, पंढरपूरचे सचिव डॉ. सुरज रोंगे यांनी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या 'विकसित भारत २०४७' या संकल्पनेशी हे विज्ञान संत अंकुश पाटील कृषी तंत्रज्ञान सुसंगत आहे.' असे सांगताना अल्प खर्चात शेतकर्‍यांनी घरच्या घरी खते व औषधे तयार करून त्यांचा वैज्ञानिक पद्धतीने उपयोग केल्यास उत्पादनात वाढ होण्याबरोबर खर्चातही लक्षणीय बचत होऊ शकते. भारत कृषिप्रधान देश होता, आहे व असणार आहे. चांगल्या पिकांचे उत्पादन घेत असताना जमिनीचा कस चांगला राखण्याचे आव्हान आजच्या शेतकऱ्यांपुढे आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांसाठी हे तंत्रज्ञान परंपरागत रासायनिक खते किंवा बाह्य बाजारावर अवलंबित्व कमी करणार आहे व शेतकर्‍यांना आर्थिक स्वावलंबनाकडे नेणारे आहे. यामुळे भारत पुन्हा एकदा कृषी महासत्ता म्हणून उभा राहू शकतो.' असे नमूद केले. 'ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाद्वारे स्वेरी सातत्याने काम करत आहे. 'ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास' हेच स्वेरीचे ब्रीद असल्याने अशा उपक्रमांना स्वेरीचे संशोधन केंद्र सर्वतोपरी सहकार्य करेल' असेही सांगितले. प्रमुख अतिथी नाशिकच्या वेंकटेश्वरा को-ऑप. पावर अँड अ‍ॅग्रो प्रोसेसिंग सह. संस्थेचे (मर्यादित) चेअरमन डॉ. शिवाजीराव डोळे म्हणाले की, 'मका-आधारित इथेनॉल निर्मिती प्रकल्प, इंदापूर हा सेवानिवृत्त जवानांना आणि स्थानिक शेतकऱ्यांना प्रेरणास्त्रोत ठरत आहे. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक मा. पंतप्रधानांच्या 'मन की बात' मध्ये व केंद्रीय ग्रहमंत्री अमित शाह यांनी केले आहे. या प्रकल्पासाठी बाराशे कोटी रुपये खर्च करून इंदापूर येथे मोठ्या पातळीवर मका-आधारित इथेनॉल संयंत्र उभारले जात आहेत; यासाठी लागणारी सुमारे रु.५२० कोटींची मका खरेदी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून थेट खरेदी केली जाणार आहे.' डॉ. डोळे यांनी सांगितले की, 'हा प्रकल्प केवळ औद्योगिक गुंतवणूक नाही, तर स्थानिक शेतकऱ्यांसाठी आर्थिक समृद्धीची आणि स्थिर बाजारपेठेची खात्री करणारा 'वरदान प्रकल्प' ठरेल. यामुळे शेतकऱ्यांना दरांचे भक्कम करार, मध्यस्थांवरील अवलंबित्व कमी होणे, तसेच पिकासाठी नवीन तांत्रिक सहाय्य आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यांनी सोलापूर जिल्ह्याचे सर्व शेतकरी व स्थानिक हितसंबंधींना या प्रकल्पाचे सभासद बनून त्याचा थेट लाभ घेण्याचे आवाहन केले व आश्वासन दिले की प्रकल्पाचे सर्व निर्णय व लाभ स्थानिक समुदायाच्या हितासाठी पारदर्शक पद्धतीने राबवले जातील. कार्यशाळा प्रशिक्षक विज्ञान संत अंकुश पाटील (सांगली) यांनी कार्यशाळेत ऊस, सोयाबीन, मका, फळे व भाजीपाला यांसारख्या सर्व पिकांसाठी आवश्यक अमिनो अॅसिड, सिलिकॉन स्टिकर, लाईम सल्फर, ह्युमिक अॅसिड, फुल्विक अॅसिड, मायक्रो न्यूट्रिएंट्स, शेण-जिवामृत, निमकरंज तेल इत्यादी जैविक खते व औषधे घरच्या घरी तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. त्यांनी प्रत्येक घटक बनविण्याचे तंत्र, वापराचे प्रमाण व पिकनिहाय शेड्युल शेतकऱ्यांना समजावून सांगितले. ही जैविक खते व औषधे त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांकडून बनवून घेतली. या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन त्यांना स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर होण्यास मदत होईल, असे त्यांच्या मार्गदर्शनात सांगितले. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते नवोन्मेषी शेतकऱ्यांना ‘पोशिंदा’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांचे अनुभव कथनही या वेळी ऐकण्यात आले. वेंकटेश्वरा को-ऑप. पॉवर अँड ऍग्रो प्रोसिसिंग सह. संस्था मर्यादित, नाशिक, मका आधारित इथेनॉल निर्मिती प्रकल्प इंदापूरचा शेअर्स शुभारंभ सुद्धा यावेळी करण्यात आला. या ऐतिहासिक कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन पोलिस किसान, पंढरपूरचे चेअरमन राजेंद्र पाटील, गणेश रत्नपारखी, बिरुदेव पारेकर, राजेंद्र डांगे, श्रीपाद डांगे, मांदे आणि प्रविण जाधव यांनी परिश्रमपूर्वक केले. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या आत्मनिर्भरतेकडे एक महत्वपूर्ण पाऊल टाकले गेले असून, महाराष्ट्रातील कृषी विकासाला नवी दिशा मिळाली आहे, हे मात्र नक्की! 

चौकट: ठळक वैशिष्ट्ये-                

१)आतापर्यंत विज्ञान संत अंकुश पाटील यांनी ३३ प्रशिक्षणे देऊन रेकॉर्ड केले.

२) या प्रशिक्षणास सुमारे २००० शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग

३) गुन्हेगारी सोडुन शेतीकडे वळलेल्या यशस्वी शेतकऱ्याला 'पोशिंदा' पुरस्काराने केले सन्मानित (पोलिस किसान पंढरपूर)

४) १२०० कोटी रुपयेच्या मका आधारित इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचा शेअर्स शुभारंभ.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad