*एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे विंग्ज २०२५-२६चे प्रकल्प प्रदर्शन उत्साहात*
*२०० हून अधिक विद्यार्थ्यांचे अभिनव प्रकल्प सादर * तांत्रिक नवकल्पनांना भरघोस प्रतिसाद*
पंढरपूर (13 ऑक्टोबर 2025): एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी (ता. पंढरपूर) येथे विंग्ज 2025-26 या वार्षिक प्रकल्प प्रदर्शनाचे भव्य आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि तांत्रिक कौशल्याला वाव देणाऱ्या या उपक्रमात अभियांत्रिकीच्या विविध शाखांतील २०० हून अधिक नावीन्यपूर्ण प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले.
या प्रदर्शनात कृत्रिम बुद्धिमत्ता, हरित तंत्रज्ञान, शाश्वत विकास, स्मार्ट सिटी, आणि औद्योगिक नवकल्पना या विषयांवर आधारित प्रकल्पांनी केंद्रस्थानी स्थान मिळवले. विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक दृष्टिकोनाला चालना देणारा आणि नवउद्यमितेचा आधारभूत दुवा ठरणारा हा उपक्रम सर्व मान्यवरांनी कौतुकास्पद ठरवला.
कार्यक्रमाचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, "प्रत्येक प्रकल्पामागे सामाजिक आणि वैज्ञानिक भान असावे. अपयशाला घाबरू नका, ध्येय गाठण्याची जिद्द आणि सातत्य ठेवा."
विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. यू. व्ही. मेटकरी यांची उपस्थितीही या कार्यक्रमात लाभली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी “विंग्ज” या उपक्रमाची भूमिका विशद केली, तर प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) अंतर्गत महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
या उपक्रमाचे मुख्य संयोजन प्रा. गणेश लकडे व प्रा. किशोर जाधव यांनी प्राचार्य डॉ. करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्यपूर्णरीत्या पार पाडले.
या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन आदेश कुलकर्णी व श्रिया जोशी यांनी केले, तर डॉ. अतुल आराध्ये यांनी उपस्थितांचे आभार मानले.
प्रदर्शनात सादर केले गेलेले काही निवडक प्रकल्प येत्या विद्यापीठस्तरीय “आविष्कार” स्पर्धेत महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनांना व्यापक व्यासपीठ मिळणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे बहुमूल्य योगदान लाभले.
“विंग्ज 2025-26 या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये नवकल्पना, आत्मविश्वास, आणि तांत्रिक नेतृत्वगुण विकसित होण्यास मोठी मदत झाली, असे प्रतिपादन आयोजकांनी केले.

