सोलापूर विद्यापीठात "एकात्म मानव जीवन दर्शन*" या विषयावर कार्यशाळा; सिंहगडच्या अथर्व कुराडे यांचे प्रभावी मनोगत

 *सोलापूर विद्यापीठात "एकात्म मानव जीवन दर्शन*" या विषयावर कार्यशाळा; सिंहगडच्या अथर्व कुराडे यांचे प्रभावी मनोगत



सोलापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण विभाग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय हिरक महोत्सवी वर्षानिमित्त एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेत विविध महाविद्यालयांचे कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक व प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. डॉ. प्रकाशजी महानवर, प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, आणि रासेयो संचालक श्री. राजेंद्र वडजे, रासेयो पंढरपूर विभाग प्रमुख डॉ. संजय मुजमुले यांची उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी कार्यशाळेच्या माध्यमातून सामाजिक विचार, सेवा आणि एकात्मतेच्या मूल्यांवर भर दिला.

या कार्यशाळेतील विशेष आकर्षण ठरले ते एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी (पंढरपूर) येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षातील विद्यार्थी आणि रासेयो अध्यक्ष अथर्व कुराडे यांचे "एकात्म मानव जीवन दर्शन" या विषयावर प्रभावी मनोगत व्यक्त केले.

आपल्या मनोगतात त्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्म मानवदर्शनाच्या तत्त्वज्ञानाचे सार स्पष्ट करताना सांगितले की, "व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक घटकांचा समतोल आवश्यक आहे. हा समतोल राखल्याशिवाय समाजाचा आणि राष्ट्राचा समग्र विकास साध्य होऊ शकत नाही.

त्यांनी पुढे ठळकपणे नमूद केले की, समाज आणि राष्ट्राच्या उभारणीसाठी प्रत्येक युवकाने सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. मोठा बदल घडविण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करणे गरजेचे असून, कोणत्याही शासन अथवा संस्थेच्या मदतीची अपेक्षा न करता आपण स्वतःहून सामाजिक कार्य करणे आवश्यक आहे.

"वसुधैव कुटुंबकम्" (संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे) आणि "अतिथी देवो भव" (अतिथी हे देव समान) या संस्कृतींमुळे समाजात सन्मान आणि आदराचे वातावरण निर्माण होतो, असेही त्यांनी नमूद केले. सध्याच्या काळात या मूल्यांचा विसर पडत असल्याने, इतरांना आदरपूर्वक वागवणे आणि सन्मान देणे गरजेचे आहे. यामुळे समाजातील भिन्नता दूर होईल आणि सर्व मानवांमध्ये एकात्मतेचे जीवन दर्शन प्रस्थापित होईल, असे मनोगतात अधोरेखित केले.

कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनात विद्यापीठाच्या रासेयो व विद्यार्थी विकास विभागाचे सहकार्य लाभले.

या उपक्रमामुळे युवकांमध्ये राष्ट्राभिमान, सामाजिक जाणीव आणि मूल्याधारित जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad