*सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी येथे डॉ. मोहन देशपांडे यांचे प्रेरणादायी व्याख्यान*
कोर्टी (ता. पंढरपूर) : सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित इंडक्शन प्रोग्रॅम अंतर्गत "कानमंत्र - यशस्वी इंजिनिअरिंग करिअरचा" या विषयावर डॉ. मोहन देशपांडे यांचे प्रेरणादायी व मार्गदर्शक व्याख्यान नुकतेच संपन्न झाले असल्याची माहिती महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या हस्ते डॉ. मोहन देशपांडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ. अनिल निकम, प्रा. बापुसो सवासे, तसेच महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व नवप्रवेशित विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या व्याख्यानात डॉ. देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचे करिअर घडवताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत यावर सखोल मार्गदर्शन केले. करिअरची निवड करताना स्वतःची आवड, बाजारातील गरज, आणि भविष्यातील दिशा यांचा योग्य समन्वय साधणे किती आवश्यक आहे, हे त्यांनी उदाहरणांच्या आधारे स्पष्ट केले. "विद्यार्थ्यांनी आपल्या आजूबाजूच्या घडामोडींबाबत सतत जागरूक राहायला हवे. समाजातील समस्यांवर वैज्ञानिक आणि तांत्रिक दृष्टिकोनातून उपाय शोधणे ही काळाची गरज आहे. एक इंजिनिअर म्हणून केवळ नोकरी मिळवणे हेच उद्दिष्ट नसून समाजोपयोगी व मूल्याधिष्ठित तंत्रज्ञान निर्माण करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे," असे मत डॉ. देशपांडे यांनी व्यक्त केले. तसेच, वैश्विक मानवी मूल्ये ही आजच्या काळात अभियांत्रिकी शिक्षणाइतकीच महत्त्वाची असून, कोणतेही तंत्रज्ञान तेव्हाच समाजोपयोगी ठरते जेव्हा त्यामध्ये मानवी मूल्यांची सांगड घातली जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी या व्याख्यानाबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, विद्यार्थ्यांना केवळ तांत्रिक शिक्षण देणे पुरेसे नाही, तर त्यांना जीवनमूल्ये, नेतृत्वगुण, आणि समाजाभिमुख दृष्टिकोन यांचेही प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. डॉ. देशपांडे यांचे मार्गदर्शन हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. दीपक गानमोटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होणेसाठी प्रथम वर्ष विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

