*पंढरपूर सिंहगडच्या प्रा. सोमनाथ झांबरे यांचा सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान*
पंढरपूर: प्रतिनिधी
सार्वजनिक यात्रा, उत्सव यात सर्वाधिक ताण-तणाव हा पोलीस प्रशासनावर येत असतो. पोलीस प्रशासनावरील ताण-तणाव कमी व्हावा यासाठी एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागात कार्यरत असलेले प्रा. सोमनाथ झांबरे यांनी सॉफ्टवेअरची निर्मिती करून पंढरपूर आषाढी वारीत महत्वपूर्ण कामगिरी बजावल्या बद्दल सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे तत्कालीन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्याकडून प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला असल्याची माहिती एस.के.न. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
आषाढी वारी मध्ये पोलीस प्रशासनावर खुप मोठी जबाबदारी असते. दर वर्षी आषाढी एकादशीला पंढरपूर येथे लाखो वैष्णवांचा मेळा भरतो. या मध्ये मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्हा व संपूर्ण महाराष्ट्रातून पोलीस बंदोबस्त मागवला जातो. गरजेनुसार ठीक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देण्यात येतो. यामध्ये विविध टप्प्यावर पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना जबाबदारी दिली जाते. अतिशय संवेदनाशील असा हा पोलीस बंदोबस्त लावण्यासाठी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग काॅलेज मधील कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनीअरिंग विभागातील प्रा. सोमनाथ झांबरे यांनी सॉफ्टवेअर बनवले होते. या साॅफ्टवेअर मधून पोलीस अधिकारी व अंमलदार यांना त्यांच्या बंदोबस्ताचे ठिकाणची माहिती, आपल्या पॉईंटचे, प्रभारी, सहप्रभारी, आपल्या सोबत असणारी टीम, हजेरी रेकॉर्ड, ड्युटी शिफ्ट अशी सर्व प्रकारची माहिती मोबाईल वर उपलब्ध झाली होती. याशिवाय वरिष्ठ पोलीस अधिकरी वेळोवेळी संपूर्ण बंदोबस्तास महत्वाच्या सूचना पाठवू शकतात. बंदोबस्त कंट्रोल विभाग संपूर्ण बंदोबस्त स्कीम, दैनंदिन गैरहजेरी अहवाल, कसुरी अहवाल, ड्युटी चार्ट असे अनेक रिपोर्ट एका क्लिक मध्ये प्राप्त करू शकतात. या सॉफ्टवेअर मुळे पोलीस प्रशासनाचे काम अधिक सुलभ झाले. या बद्दल प्रा. सोमनाथ झांबरे यांना सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर ग्रामीण यांच्या कडून प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले आहे.
प्रा. सोमनाथ झांबरे यांना पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित केल्याबद्दल महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.